महिला रुग्णालयाला वाढीव १०० खाटा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:45 PM2019-06-05T23:45:23+5:302019-06-05T23:47:26+5:30
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात लोकार्पण झालेल्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता १०० खाटांचे हे रुग्णालय आता २०० खाटांचे होणार आहे. त्यासाठी वाढीव १०० खाटांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात लोकार्पण झालेल्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता १०० खाटांचे हे रुग्णालय आता २०० खाटांचे होणार आहे. त्यासाठी वाढीव १०० खाटांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ३० कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. त्यामुळे या रुग्णालयातील सध्या भेडसावत असलेल्या अनेक समस्या दूर होणार आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवा परिपूर्ण नसल्यामुळे गाव आणि तालुकास्तरावरून बहुतांश गरोदर महिलांना जिल्हा महिला व बाल रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे या रुग्णालयाची भरती रुग्णांची क्षमता १०० असली तरी २०० ते ३०० रुग्ण दाखल असतात. परंतू मनुष्यबळ १०० खाटांच्या प्रमाणातच मंजूर असल्यामुळे डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे.
ही समस्या दूर करण्यासाठी वाढीव १०० खाटांची मागणी आमदार डॉ.देवराव होळी यांनी राज्य शासनाकडे लावून धरली होती. खासदार अशोक नेते यांनीही त्याबाबत राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. या प्रयत्नांना यश आले असून अतिरिक्त १०० खाटांमुळे या रुग्णालयाची सेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयाच्या तीन मजली इमारतीवर आणखी मजला चढविण्याची परवानगी नाही. त्यामुळे वाढीव खाटांसाठी दुसºया जागेत इमारत बांधणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी रुग्णालयाच्या बाजुला असलेल्या जिल्हा परिषदेची जागा सोयीचे होणार आहे. ती जागा द्यावी असा प्रस्ताव जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. जि.प.च्या येत्या सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
कोट्यवधीच्या यंत्रसामग्रीसाठी तंत्रज्ञच नाही
गडचिरोली जिल्ह्यात महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग जास्त प्रमाणात आढळत असल्यामुळे त्याच्या तपासणीसाठी काल्पोस्कोपीची अत्याधुनिक मशिन महिला व बाल रुग्णालयात उद्घाटनाच्या वेळीच लावली होती. परंतू ती मशिन हाताळण्यासाठी कोणत्याच स्त्रीरोग तज्ज्ञाला आरोग्य विभागाकडून विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे वर्षभरापासून ती मशिन धूळखात पडली आहे. यासोबतच स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी असलेल्या मॅमोग्राफीच्या मशिनसाठीही विशेष प्रशिक्षित क्ष-किरण तज्ज्ञ नाही. या दोन्ही मशिनसाठी योग्य तंत्रज्ञांची नेमणूक करण्याची गरज आहे.
वर्षभरात ४५०१ जन्म, १५७ मृत्यू
सदर रुग्णालयात एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत ४५०१ बाळांचा जन्म झाला आहे. त्यात ४९ जुळ्या बाळांचाही समावेश आहे. तसेच १५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ३ माता, १२५ नवजात बाळ आणि १ महिना ते १ वर्षपर्यंतच्या १७ बाळांचा समावेश आहे. वर्षभरात १६६२ मोठे आॅपरेशन तर १८९७ छोटे आॅपरेशन या रुग्णालयात झाले. यादरम्यान ४९ हजार ४११ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात २७ हजार २८५ महिला आणि २२ हजार १०९ बालकांचा समावेश आहे.
रक्तपेढीची सक्त गरज
या रुग्णालयात रक्तपेढी किंवा रक्त साठवणूक केंद्र नसल्यामुळे रुग्णांना लागणाºया रक्तासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क करावा लागतो. त्यात वेळ जाऊन अनेक वेळा रुग्णाच्या जीवावर बेतते. केंद्रातील रक्ताच्या बदल्यात रुग्णाचे नातेवाईक रक्तदान करतात. पण सध्या ती सोय या रुग्णालयात नसल्यामुळे नातेवाईकांना लांब अंतरावर असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन ही सर्व प्रक्रिया करणे कठीण जाते.
रुग्णालयात रक्तपेढीची गरज आहेच. त्यासाठी ६ महिन्यांपासून जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार सुरू आहे. पण तूर्त रक्तसाठा केंद्र मंजुरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यासाठी लागणाºया सर्व गोष्टी परिपूर्ण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
- डॉ.दीपचंद सोयाम,
वैद्यकीय अधीक्षक,
महिला व बाल रुग्णालय