१०० विहिरी तरीही पाणी संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:32 PM2019-04-14T22:32:11+5:302019-04-14T22:32:26+5:30
आरमोरी तालुक्याच्या वैरागड गावात आजही १०० पेक्षा अधिक विहिरी आहेत. मात्र मागील १५ दिवसापासून या गावात पाणी संकट निर्माण झाले आहे. येथील गोरजाई डोहावरील नळ योजना कित्येक दिवसांपासून रखडली आहे. परिणामी पाणी पातळी खाली गेल्याने भर उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : आरमोरी तालुक्याच्या वैरागड गावात आजही १०० पेक्षा अधिक विहिरी आहेत. मात्र मागील १५ दिवसापासून या गावात पाणी संकट निर्माण झाले आहे. येथील गोरजाई डोहावरील नळ योजना कित्येक दिवसांपासून रखडली आहे. परिणामी पाणी पातळी खाली गेल्याने भर उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
वैरागड येथे ३० वर्षांपूर्वीची ७५ हजार लिटर क्षमतेची जुनी नळ योजना आहे. गावातील वाढती लोकसंख्या व पाण्याचे असमान वितरण गेल्या १५ दिवसांपासून या गावात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील काही भागात पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्यांना गावातील नळ योजनेचे पाणी मिळत नाही, असे कुटुंब ज्या ठिकाणी नळ आहे, त्या ठिकाणी पाच ते सहा फुटाचे खड्डे करून नळाचे पाणी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. गावातील नळ योजनेची पाणी वितरण व्यवस्था अयोग्य व असमान आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना पाणी मिळत नाही. वैरागड गावातील पाणी संकट लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचातय प्रशासनाने येथील गोरजाई डोहावर वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात नियोजन करण्यात आले. मात्र ही योजना मार्गी लागली नाही. पाणी कुठे मुरले, हे अद्यापही समजले नाही. २०१८ च्या मार्च महिन्यात या नळ योजनेच्या कामाला सुरूवात होणार होती. मात्र २०१९ चा मार्च महिना उलटला तरी वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाला मुहूत सापडला नाही. परिणामी ग्रामस्थांकडून स्थानिक प्रशासन, लोक प्रतिनिधी, तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या अधिकाऱ्याप्रती नाराजी व्यक्त होत आहे. गोरजाई डोहावरील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या ज्या काही तांत्रिक अडचणीत आहेत, त्या अडचणी दूर करून तत्काळ या योजनेचे काम हाती घेण्यात यावे, जेणे करून वैरागडातील पाणी संकट दूर होईल, असे नागरिकांची मागणी आहे.
वैरागड येथील वाढीव पाणी पुरवठा योजनेचे कागदोपत्री काम शेवटच्या टप्प्यात आहे. मंत्रालयातून वर्क आॅर्डर मिळणार असल्याच्या स्थितीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता संपल्यानंतर लगतच तांत्रिक बाबीची पूर्तता करून कामाला लवकरात लवकर सुरूवात करण्यात येईल, असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
- एन. ए. घुटके,
ग्राम विकास अधिकारी,
ग्रामपंचायत वैरागड