अतिदुर्गम १०४ गावांनी घेतला दारूमुक्तीचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:32 AM2021-03-14T04:32:05+5:302021-03-14T04:32:05+5:30
गडचिरोली- एटापल्ली तालुक्यातील डोडी येथे ४२ गावांचा समावेश असलेला तोडसा व ६२ गावे समाविष्ट असलेल्या वेनासर इलाख्याची संयुक्त बैठक ...
गडचिरोली- एटापल्ली तालुक्यातील डोडी येथे ४२ गावांचा समावेश असलेला तोडसा व ६२ गावे समाविष्ट असलेल्या वेनासर इलाख्याची संयुक्त बैठक १० मार्च रोजी पार पडली. यावेळी जिल्हा दारूबंदीला अतिदुर्गम भागातील १०४ गावांनी समर्थन दर्शवित दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. सोबतच दारूमुक्त गाव निर्माण करण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यात १९९३ मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली. शासकीय दारूबंदीनंतर शेकडो गावांनी आपल्या गावात दारूबंदी लागू केली. यामुळे दारूचा वापर कमी झाला. अनेक गावांतील स्त्रिया व गावातील लोक संघटित व सक्रिय होऊन गावाची दारूबंदी करीत आहेत. त्यामुळे अनेक गावे दारूविक्री मुक्त झाले आहेत. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत १०४ गावांनी जिल्हा दारूबंदीला समर्थन दर्शविले आहे. दारूबंदी अधिक मजबूत करण्याची मागणी या गावांनी केली आहे. सोबतच व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी दोन्ही इलाख्यातील गावांमध्ये अवैध दारूविक्री बंद करणे, खर्रा, तंबाखूचे प्रमाण कमी करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
यावेळी तालुका ग्रामसभा अध्यक्ष नंदू मटामी, तोडसा पट्टीचे सचिव गोंगलू गावडे, वेनासर इलाखा पट्टीचे अध्यक्ष सुधाकर गोटा, तालुका संघटक किशोर मलेवार यांच्यासह तालुक्यातील गावपाटील व भूमय्या उपस्थित होते.