१०५ जोडपी होणार विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:39 AM2018-04-29T00:39:57+5:302018-04-29T00:39:57+5:30
मैत्री परिवार संस्था नागपूर, जिल्हा पोलीस विभाग, धर्मदाय आयुक्त नागपूर विभाग व साईभक्त, साई सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील मूल मार्गावरील अभिनव लॉन येथे २९ एप्रिल रोजी रविवारी सकाळी १० वाजता जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मैत्री परिवार संस्था नागपूर, जिल्हा पोलीस विभाग, धर्मदाय आयुक्त नागपूर विभाग व साईभक्त, साई सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील मूल मार्गावरील अभिनव लॉन येथे २९ एप्रिल रोजी रविवारी सकाळी १० वाजता जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या विवाह सोहळ्यात १०५ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. यामध्ये दोन आत्मसमर्पीत नक्षल्यांचा सुद्धा समावेश आहे, अशी माहिती मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सामूहिक विवाह सोहळ्यासाठी ३२ हजार चौरस फुटावर भव्य विवाह मंडप व २० हजार चौरस फूटावर जेवनाचा मंडप उभारण्यात आला आहे. प्रत्येक समाजातील चालीरितीप्रमाणे विवाह करता यावा, यासाठी १० यज्ञकुंड ठेवले जाणार आहेत. कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडण्यासाठी १४ आयोजन समित्या तयार करण्यात आले आहेत. आयोजकांमार्फत जोडप्यांना पोशाख, नवरीला मंगळसूत्र व संसारोपयोगी साहित्य, आईवडिलांना अहेर दिला जाणार आहे. वधू व वरांकडील प्रत्येकी १५ नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आले आहे. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर २१० नवविवाहीत वधू-वरांची जेवणाची पंगत विशेष आकर्षण असणार आहे. सगळे विधी आटोपल्यानंतर वधू-वरांची वाजतगाजत पाठवणी केली जाईल.
केवळ लग्न लावून दिल्यानंतर आपली जबाबदारी संपली, अशी भूमिका न घेता या नवदाम्पत्यांचा संसार सुखाचा व्हावा, म्हणून लग्नानंतरही दीड वर्ष या जोडप्यांचे पालकत्व मैत्री परिवार स्वीकारणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला प्रा. प्रमोद पेंडके, पोलीस उपअधीक्षक (गृह) सतीश चौगावकर, डॉ. शिवनाथ कुंभारे, साखरकर, सहायक धर्मदाय आयुक्त प्रताप सातव, निरंजन वासेकर, दिलीप ठाकरे, सम्राट वाघ, अनिल तिडके आदी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपमहानिरीक्षक सीआरपीएफ (अभियान) टी. शेखर राहतील. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित राहतील.
गडचिरोली शहरात पोलीस विभागाच्या वतीने पहिल्यांदाच १०५ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. यापूर्वी संबंधित जोडप्याचा विवाह झाला नाही, याची पोलीस विभागाने खात्री केली आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.