शासकीय आश्रमशाळेतील १०६ विद्यार्थ्यांना विषबाधा; धानोरा तालुक्यातील घटना
By संजय तिपाले | Published: December 20, 2023 09:46 PM2023-12-20T21:46:30+5:302023-12-20T21:46:42+5:30
२९ जणांना जिल्हा रुग्णालयात हलविले
संजय तिपाले, गडचिरोली: तालुक्यातील सोडे गावात शासकीय आश्रमशाळेतील १०६ विद्यार्थ्यांना २० डिसेंबरला दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून ७७ जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून २९ विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी दाखल झाल्याने खाटा अपुऱ्या पडल्या, यंत्रणेचीही तारांबळ उडाली.
तालुका मुख्यालयापासून ४ किलोमीटरवरील सोडे या गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आहे. पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी तेथे शिक्षण घेतात.
सध्या ३९० मुली व दहा मुले असे एकूण ३९० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ३७९ विद्यार्थिनी वसतिगृहात राहतात. दरम्यान, २० डिसेंबरला ३५८ विद्यार्थी उपस्थित होते. दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना कोबी, वरण भात असा मेन्यू होता, सोबत गाजरी खाण्यासाठी दिले होते. जेवण केल्यानंतर अर्ध्या तासांनी काही विद्यार्थ्यांना डोकेदुखी, मळमळ असा त्रास जाणवू लागला. पाहता- पाहता ही संख्या १०६ वर पोहोचली. शाळा प्रशासनाने तातडीने या विद्यार्थ्यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्रकृती अधिकच खालावल्याने २९ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.
प्रकल्पाधिकाऱ्यांची तातडीने धाव
गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्पाधिकारी राहुल मीणा यांनी या घटनेनंतर सोडे येथे आश्रमशाळेला भेट दिली. घटनेची माहिती जाणून घेतल्यानंतर ते ग्रामीण रुग्णालयात पोहोचले व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर ते जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठीही पोहोचले. यावेळी समवेत सहायक प्रकल्पाधिकारी अनिल सोमनकर व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयातून टीम पाचारण
या घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते हे तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसह धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. जिल्हा रुग्णालयातही यंत्रणा सज्ज असून विद्यार्थ्यांना उपचारात कुठलीही निष्काळजी होणार नाही, यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गजबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सखाराम हिचामी हे अधिकारी तळ ठोकून आहेत.
अन्न नमुने तपासणीसाठी...
दरम्यान, या घटनेनंतर अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली, अन्न नमुने घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. अहवाल आल्यानंतर सत्य समोर येईल, पण अन्नातूनच ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.