नऊ महिन्यात १०,७६३ वाहन नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:33+5:30
दरवर्षी वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. पूर्वी चैनीची वस्तू म्हणून वाहनांकडे पाहिले जात होते, पण आता प्रत्येकासाठी वाहन गरजेचे होऊ पाहात आहे. त्यामुळे प्रत्येक घरात किमान दुचाकी वाहन दिसू लागले आहे. गेल्यावर्षी (२०१८) एप्रिल ते डिसेंबर यादरम्यान ८३१६ मोटार सायकल, ७८१ कार आणि ९८९ इतर वाहनांची नोंदणी झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एप्रिल ते डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यात १० हजार ७६३ वाहनांची नोंदणी करत १८ कोटी रुपयांचा महसूल शासनाला मिळवून दिला. आरटीओ कार्यालय नवीन आणि प्रशस्त इमारतीत स्थानांतरित झाल्यापासून कामांचा वेग वाढला असून ऑनलाईन पद्धतीमुळे या कार्यालयाचे काम अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत झाले आहे. विशेष म्हणजे मंजूर असलेल्या पदांपैकी ५० टक्के पदे रिक्त असतानाही प्रलंबित कामांचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसून येते.
दरवर्षी वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. पूर्वी चैनीची वस्तू म्हणून वाहनांकडे पाहिले जात होते, पण आता प्रत्येकासाठी वाहन गरजेचे होऊ पाहात आहे. त्यामुळे प्रत्येक घरात किमान दुचाकी वाहन दिसू लागले आहे. गेल्यावर्षी (२०१८) एप्रिल ते डिसेंबर यादरम्यान ८३१६ मोटार सायकल, ७८१ कार आणि ९८९ इतर वाहनांची नोंदणी झाली होती. यावर्षी सर्वच वाहनांच्या नोंदणीत वाढ झाली. एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत ८७८१ मोटारसायकल, ७९२ कार आणि ११९० इतर वाहनांची नोंदणी झाली आहे. म्हणजेच यावर्षी ९ महिन्यात ६७७ अधिक वाहनांची नोंदणी झाली आहे.
वाहन नोंदणीसह विविध माध्यमातून परिवहन विभागाने डिसेंबर अखेरपर्यंतच्या ९ महिन्यात १८ कोटी ३ लाखांचा महसूल वसूल केला. गेल्यावर्षी याच कालावधीत १४ कोटी ६१ लाखांचा महसूल मिळाला होता. विविध करांपोटी यावर्षी १ कोटी २६ लाख रुपयांचा महसूल या विभागाला मिळाला आहे.
यावर्षी ९ महिन्यात जादा भार वाहून नेणाऱ्या वाहनधारकांकडून ४ लाख ७१ हजार १३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्यावर्षीपेक्षा या नियमांतर्गत कारवायांचे प्रमाण घटले. शासनाने वाहनांची वजन मर्यादा वाढविल्यामुळे दोषी वाहनांचे प्रमाण घटल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. पूर्वी भार वाहून नेणाऱ्या वाहनाची वजन मर्यादा ३१,००० किलोग्रॅम होती. ही मर्यादा ३५,००० किलोग्रॅम वाढविल्यामुळे कारवाईसाठी पात्र ठरणाऱ्या वाहनांची संख्या घटल्याचे दिसून येते.
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस आणि इतर वाहनांवरील कारवायांमधून सदर विभागाला ५ लाख १८ हजार ४३४ रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यात बसवरील कारवायांमधून १ लाख ८ हजार तर बस व्यतिरिक्त इतर वाहनांवरील कारवायांमधून ४ लाख १० हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.
५० टक्के जागा रिक्त, तरीही कामकाज सुरळीत
विशेष म्हणजे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध पदांच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. मात्र तरीही त्याचा दैनंदिन कामकाजावर फारसा फरक पडला नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांनी सांगितले. रिक्त पदांमध्ये सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी १, मोटार वाहन निरीक्षक ५, सहायक मोटार वाहन निरीक्षक १९, आणि वरिष्ठ लिपीक १ अशा विविध पदांच्या एकूण २६ जागा रिक्त आहेत. यापूर्वी याहीपेक्षा जास्त जागा रिक्त होत्या. काही महिन्यांपूर्वी ७ मोटार वाहन निरीक्षक मिळाले, पण तरीही त्यांच्या ५ जागा रिक्त आहेत. एक निरीक्षक प्रतिनियुक्तीवर मुंबईला कार्यरत आहे.
परिवहन विभागाचे काम आता अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक झाले आहे. वाहनधारकांनी आपल्या वाहनांचा कर वेळोवेळी भरून योग्यता प्रमाणपत्र घ्यावे. कर चुकवणाऱ्या आणि योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनधारकांवर कारवाईसाठी लवकरच मोहीम सुरू केली जाणार आहे.
- रवींद्र भुयार,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली