११९६ गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 10:53 AM2017-10-26T10:53:06+5:302017-10-26T10:56:50+5:30

आतापर्यंत १०३६ गावांनी नक्षल्यांना गावबंदी करण्याचा ठराव घेतला. त्यात यावर्षी आॅगस्ट २०१७ पासून आतापर्यंत १४० गावांना नक्षल गावबंदी करून विकास कामांना सहकार्य करण्याचे ठरविले.

11 9 6 villages took the resolution against naxal activity | ११९६ गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव

११९६ गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव

Next
ठळक मुद्दे यावर्षी १४० गावांचा पुढाकार नक्षलवादाने भ्रमनिरास झालेल्यांना हवा विकास

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : नक्षल चळवळ गावकºयांच्या सहकार्याशिवाय टिकाव धरू शकत नाही. त्यामुळे गावकºयांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नक्षलवाद्यांपासून दूर करून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांमार्फत गेल्या १४ वर्षांपासून नक्षल गावबंदी योजना राबविली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत १०३६ गावांनी नक्षल्यांना गावबंदी करण्याचा ठराव घेतला. त्यात यावर्षी आॅगस्ट २०१७ पासून आतापर्यंत १४० गावांना नक्षल गावबंदी करून विकास कामांना सहकार्य करण्याचे ठरविले.
गडचिरोली जिल्ह्यात १९८० पासून नक्षल चळवळ स्थिरावल्यानंतर विकास कामांच्या गतीवर परिणाम झाला. दुष्काळाच्या परिस्थितीतही नक्षलवादी सामान्य नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून शासकीय विकास कामांना विरोध करण्यास भाग पाडत होते. यावर उपाय म्हणून सन २००३ पासून शासनाकडून नक्षल गावबंदी योजना सुरू करण्यात आली. ही योजना अंमलात आल्यामुळे नक्षलवाद्यांकडून विविध गावांमध्ये होणाºया नुकसानीच्या घटनांची माहिती शासनाला प्राप्त होऊन नक्षल चळवळीला लगाम बसत आहे.
नक्षलवाद्यांच्या दहशतीला झुगारून शासनावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल संबंधित गावाला प्रोत्साहन म्हणून शासनाच्या वतीने ३ लक्ष रूपये देण्यात येतात. आतापर्यंत असा ठराव घेतलेल्या १०३६ गावांचे प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी शासनाकडून ८७० गावांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. १४६ प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत.
गावबंदी केलेल्या गावात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेकडून विविध प्रकारच्या सोयी करण्यात येतात. त्यामुळे गावकºयांना या गावबंदीत आपले हित असल्याचे लक्षात येत आहे.

काय आहे नक्षल गावबंदी?
नक्षल गावबंदीच्या ठरावात गावकरी पुढील निर्णय घेतात. त्यात नक्षलवाद्यांना गावात येऊ देणार नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही, नक्षल सभेत जाणार नाही, गावातील मुलामुलींना नक्षल दलममध्ये जाऊ देणार नाही, गावात नक्षल संघटना स्थापन होऊ देणार नाही, शासनाच्या प्रत्येक विकास कामात सर्व गावकरी मदत करणार, नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्यांना संघटीतपणे प्रतिकार करणार अशा मुद्द्यांचा या ठरावात समावेश असतो.

गोंदिया व चंद्रपूरमध्येही गावबंदीसाठी पुढाकार
च्या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात सन २००३ ते आॅगस्ट २०१७ पर्यंत एकूण ७३ गावांत नक्षल्यांना गावबंदी करण्यात आली असून ४० प्रस्ताव शासनाकडून मंजुर झाले आहेत.
च्चंद्रपूर जिल्ह्यात आॅगस्ट २०१७ पर्यंत एकूण ८० गावांत नक्षल्यांना गावबंदी करण्यात आली. त्यापैकी ४६ प्रस्ताव शासनाकडून मंजुर झाले आहेत. उर्वरीत मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.

लोकांची दिशाभूल करून बंदुकीच्या धाकावर नक्षल्यांनी आतापर्यंत गावांचा विकास होऊ दिला नाही. मात्र हे आता गावकºयांच्या लक्षात आले आहे. उर्वरित गावकºयांनीही गावबंदी योजनेचा लाभ घेऊन नक्षल्यांना गावबंदी करून गावाचा विकास करावा.
- शरद शेलार, विशेष पोलीस महानिरीक्षक
नक्षल विरोधी अभियान

Web Title: 11 9 6 villages took the resolution against naxal activity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.