११ रेती तस्करांना एक वर्षाचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:08 AM2019-06-07T00:08:44+5:302019-06-07T00:10:41+5:30
तालुक्यातील अलोणी रेतीघाटातून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ११ आरोपींना न्यायालयाने एक वर्षाचा सश्रम कारावास व ५५ हजार १०० रुपये दंडाची शिक्षा ६ जून रोजी सुनावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुक्यातील अलोणी रेतीघाटातून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ११ आरोपींना न्यायालयाने एक वर्षाचा सश्रम कारावास व ५५ हजार १०० रुपये दंडाची शिक्षा ६ जून रोजी सुनावली आहे.
दिवाकर राजेश्वर पिपरे (३६) रा. बोदली मेंढा, मुकेश सधाकर नैताम (२६) रा.माडेतुकूम, सुशील दिवाकर कोठारे (३१) रा.इंदिरानगर, किरण शंकर कोहळे (२६) रा.व्याहाड (बुज), प्रवीण प्रभाकर चापडे रा.हनुमान वॉर्ड गडचिरोली, अरूण सुखदेव पिपरे रा.लांझेडा, हेमंत वसंतराव सोमनकर (४०) रा.लांझेडा, गणेश रामकृष्ण भुरले (२३) रा.माडेतुकूम, जितेंद्र रमेश भांडेकर (२७) रा.माडेतुकूम, चेतन तुकाराम गडपल्लीवार (२३) रा.बोदली मेंढा, श्यामलता विनोद दुग्गा रा.बेलगाव ता.धानोरा अशी आरोपींची नावे आहेत.
या ११ आरोपींनी संगणमत करून अलोणी येथील रेतीघाटातील रेती अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची माहिती तहसील कार्यालयाला प्राप्त झाली. तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी माडेतुकूम ते बोदली मार्गावर थांबले असता, पाच ट्रॅक्टर रेतीची वाहतूक करीत होते. या रेती तस्करांकडे परवाना नव्हता. त्यामुळे गडचिरोलीचे मंडळ अधिकारी सोमेश्वर सुखरू बारसागडे यांनी गडचिरोली पोेलीस स्टेशनमध्ये २० एप्रिल २०१७ रोजी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बेलदार यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. आरोपींविरोधात सबळ पुरावे आढळल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एम.पाटील यांनी आरोपींना कलम ३७९/३४ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास प्रत्येकी एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा दिली.
सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता योगीता राऊत यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सोरते यांनी जबाबदारी सांभाळली.
रेती तस्कर धास्तावले
रेती तस्करांना शिक्षा होण्याची ही जिल्ह्यातील कदाचित पहिलीच वेळ असावी. रेती तस्करी करताना एखादा ट्रॅक्टर आढळून आल्यास त्याच्यावर महसूल विभाग दंड ठोठावते तर काही महसूल कर्मचारी पाच-दहा हजार रुपयांची चिरिमिरी घेऊन मोकळे होत होते. शिक्षा होत नसल्याने रेती तस्कर निर्ढावले होते. पैशाच्या बळावर प्रशासकीय यंत्रणा बांधून ठेवता येते, असा समज त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. मात्र न्यायालयाने त्यांना दंडाबरोबरच कारावासीचीही शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेमुळे इतर रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किमान अशा निकालांमुळे तरी रेती तस्करीला आळा बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.