११ तालुके कोरोनामुक्तीच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:00 AM2020-07-24T05:00:00+5:302020-07-24T05:00:47+5:30
जिल्ह्यातील एकूण २५१ कोरोना रूग्णांपैकी २२९ रूग्ण एकट्या गडचिरोली तालुक्यातील आहेत. यामध्ये सुरक्षा दलातील कोरोनाबाधीत जवानांची संख्या अधिक आहे. इतर तालुक्यांमध्ये केवळ २२ कोरोनाबाधीत रूग्ण आहेत. गडचिरोली वगळता इतर ११ तालुक्यांमध्ये आतापर्यंत बाहेरून आलेले १३१ रूग्ण बाधित असल्याचे आढळले आहेत. त्यापैकी १०८ रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी तीन तालुक्यात एकही सक्रीय रूग्ण नाही. पाच तालुक्यांमध्ये १ ते २ सक्रीय रूग्ण आहेत. उर्वरित तीन तालुक्यांमध्ये सहा पेक्षा कमी सक्रीय रूग्ण आहेत. गडचिरोली तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे. हे तालुके लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील एकूण २५१ कोरोना रूग्णांपैकी २२९ रूग्ण एकट्या गडचिरोली तालुक्यातील आहेत. यामध्ये सुरक्षा दलातील कोरोनाबाधीत जवानांची संख्या अधिक आहे. इतर तालुक्यांमध्ये केवळ २२ कोरोनाबाधीत रूग्ण आहेत. गडचिरोली वगळता इतर ११ तालुक्यांमध्ये आतापर्यंत बाहेरून आलेले १३१ रूग्ण बाधित असल्याचे आढळले आहेत. त्यापैकी १०८ रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित सर्व रूग्णांना कोणतेही लक्षणे नाहीत. त्यामुळे त सुध्दा कोरोनामुक्त होतील, असा विश्वास आरोग्य प्रशासनाने व्यक्त केला आहे.
एकूण ४२९ रूग्णांपैकी १७७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. केवळ सिरोंचा येथील एका रूग्णाचा हैदराबादमध्ये मृत्यू झाला.
जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार ९९३ चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये आरटीपीसीआरसह ट्रू नॅट व राटी चाचण्यांचा समावेश आहे. ११ हजार २८८ चाचण्या नकारात्मक आल्या आहेत. जास्त प्रमाणात चाचण्या घेण्यात आल्यामुळे कोरोनाबाधित आढळून येत आहेत.
आतापर्यंत केंद्रीय व राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांसह २ सीमा सुरक्षा दलाचे जवान मिळून २९१ जवानांना कोरोनाने ग्रासले आहे. हे सर्व जवान आपापल्या गृहजिल्ह्यातून आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी विलगिकरणात होते. त्यांची स्वॅब चाचणी घेण्यात आली. त्यातील अनेक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या अॅक्टिव्ह रुग्ण २५१ आहे. कोरोनामुळे मृत्यू ओढवण्याचे प्रमाण जिल्ह्यात नगण्य आहे. गेल्या चार महिन्यात जिल्ह्यातील केवळ एका रुग्णाचा हैदराबाद येथे मृत्यू झाला.
४२९ कोरोनाग्रस्तांमध्ये २९३ जवानांचा समावेश
४२९ कोरोनाबाधितांमध्ये २९३ सुरक्षा दलातील जनावांचा समावेश आहे. हे सर्व जवान जिल्हाबाहेरून बाधित होऊन आले होते. यामध्ये २०१ एसआरपीएफचे जवान, ८८ सीआरपीएफ, २ बीएसएफ व २ पोलीस जवानांचा समावेश आहे. एकूण रूग्णांपैकी राज्यबाहेरील ८३, जिल्हाबाहेरील २१० व जिल्ह्यातीलच रहिवासी असलेले परंतु बाहेरून आलेल्या १३६ नागरिकांचा समावेश आहे.
कडक निर्बंध लागू राहणार -जिल्हाधिकारी
कोरोना नियंत्रीत ठेवण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध पुढेही चालूच राहणार आहेत. जिल्हाबाहेरील नागरिकांचा विनापरवाना प्रवेश होऊ दिला जाणार नाही. मागील काही आठवड्यांमध्ये ग्रामीण भागात आलेल्या प्रवाशांना विलगीकरणात ठेवून कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास प्रशासनाला यश मिळाले आहे. जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान दरवर्षीप्रमाणे विविध ठिकाणावरून येत राहतात. मात्र यावेळी कोरोनाबाधीत क्षेत्रातून कर्तव्य पाडून जिल्ह्यात दाखल झाले. जिल्ह्यात आल्यानंतर त्यांना स्वतंत्र विलगीकरणात ठेवण्यात आले होते. शहरातील नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. परंतु आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन दीपक सिंगला यांनी केले आहे.
पाच रूग्णांची भर
गुरूवारी पुन्हा पाच एसआरपीएफ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधीतांची संख्या ४२९ झाली आहे. जिल्हाभरात १ हजार १९४ नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणात तर १ हजार ४४९ नागरिकांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण ३९ प्रतिबंधीत क्षेत्र होते. त्यापैकी २८ क्षेत्र बंद करण्यात आले असून ११ क्षेत्र सुरू आहेत. मुलचेरा तालुक्यातील कोपरअल्ली माल, विवेकानंदपूर व सिरोंचा येथील प्रतिबंधीत क्षेत्र वगळण्यात आले आहे.