‘सर्च’मधील शिबिरात ११२ शस्त्रक्रिया; सातारा-सांगलीतील चमूद्वारे उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 05:56 PM2020-01-14T17:56:09+5:302020-01-14T17:56:37+5:30
पूर्व विदर्भातील रूग्णांना लाभ
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सर्च येथील माँ दंतेश्वरी दवाखान्यात विविध आजारांवरील उपचारासाठी शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यात तब्बल ११२ शस्त्रक्रिया झाल्या. सातारा व सांगली येथील १४ डॉक्टरांच्या चमूने या शस्त्रक्रिया केल्या. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, सिरोंचा येथील दुर्गम भागातील रूग्णांसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि छत्तीसगड राज्यातील रूग्णांचा यात समावेश असल्याचे सर्चकडून कळविण्यात आले.
रूग्णांची गरज लक्षात घेत नियमित शिबिरे आयोजित केली जातात. शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रूग्णांसाठी नुकतेच शिबीर घेण्यात आले. शिबिरात एकूण ११२ शस्त्रक्रिया झाल्या. यामध्ये पोटावरचा हर्निया ८, लहान मुलांचा हर्निया ५, हायड्रोसिल आजाराच्या १०, अंगावरील गाठी असलेल्या रूग्णांच्या २३, हर्नियाचा त्रास असलेल्या पुरुषांच्या २५, गर्भपिशवी संदर्भातील ३२, थायरॉईड २, अपेंडिक्स ३ तर पाईल्स, फिशर व भगंदर या आजाराच्या ४ शस्त्रक्रियांचा समावेश होता. डॉ. गिरीश पेंढारकर, डॉ. मिलिंद शहा यांच्यासह डॉ.शशिकांत पवार, डॉ.प्रमोद राजभोई, डॉ.जयवंत देवरे, डॉ. सविता मोहिते, डॉ. साखरे, डॉ.देवरे, डॉ.पडालकर, डॉ.राजेंद्र वैरागर या सातारा व सांगली जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने या शस्त्रक्रिया केल्या. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. रसाळ, डॉ.जयवंत पाटील, डॉ.सुजीत अडसूळ आणि डॉ. वैभव माने यांनी जबाबदारी सांभाळली. युसूफ मुलानी, सचिन शिर्के आणि राजू मुलानी आदींनी सहायक म्हणून काम पाहिले.
पुण्याच्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातील फिजिओथेरपीचे विद्यार्थी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना सेवा देत आहेत. दवाखान्याच्या संचालक डॉ. राणी बंग यांच्या मार्गदर्शनात डॉ.वैभव तातावार, डॉ.मृणाल काळकोंडे, डॉ.मयुरी भलावी, डॉ.अभिषेक पाटील, डॉ. दत्ता भलावी, डॉ. कोमल भट आणि संपूर्ण कर्मचाºयांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.