कामगारांना १.१९ कोटींचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:36 AM2018-12-06T00:36:03+5:302018-12-06T00:37:15+5:30
बांधकाम क्षेत्रात (जोखमीच्या) काम करणाऱ्या कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्याअंतर्गत जिल्ह्यात गेल्या ४ वर्षात १९३७ कामगारांना २५ पेक्षा जास्त योजनांचा लाभ देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बांधकाम क्षेत्रात (जोखमीच्या) काम करणाऱ्या कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्याअंतर्गत जिल्ह्यात गेल्या ४ वर्षात १९३७ कामगारांना २५ पेक्षा जास्त योजनांचा लाभ देण्यात आला. त्यासाठी १ कोटी १९ लाख ८१ हजार रुपये खर्च करण्यात आले.
सध्या सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाभरातील बांधकाम क्षेत्रात काम करणाºया मजुरांची नोंदणी करण्यासाठी अटल विश्वकर्मा अभियान राबविले जात आहे. १९ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०१८ या कालावधीत राबविल्या जात असलेल्या या अभियानात आतापर्यंत ४५२५ कामगारांची नोंदणी झाली आहे.
२०११ मध्ये राज्य शासनाने कामगारांंना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कामगार मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून जोखमीच्या क्षेत्रात काम करणाºया कामगारांची नोंदणी करणे सुरू केले. परंतू निधीअभावी योजनांचा लाभ मिळाला नव्हता. २०१४ पासून कामगारांना त्यांच्यासाठी आखलेल्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ देणे सुरू झाले. अटल विश्वकर्मा अभियानांतर्गत कामगारांची नोंदणी सुरू होण्यापूर्वी चार वर्षात ३८९९ कामगारांची नोंदणी कामगार अधिकारी कार्यालयात झाली होती. कामगारांसाठी असलेल्या योजनांचा प्रचार व प्रसार केला जात नसल्यामुळे त्यांना योजनांची माहितीच नव्हती. परिणामी चार वर्षात अवघी ३८९९ कामगारांची नोंदणी झाली. परंतू आता हे अभियान सुरू झाल्यानंतर अवघ्या २० दिवसात ४ हजारावर कामगारांची नोंदणी झाली. कार्यालयामार्फत यापुढेही नोंदणी सुरू राहणार आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांची कमतरता
जिल्ह्यात मोठे उद्योग नसले तरी छोट्यामोठ्या उद्योगात व बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार बरेच आहेत. परंतू त्यांच्यासाठी असलेल्या सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. यामागील कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता गडचिरोलीत सरकारी कामगार अधिकाऱ्यांसह कर्मचारीच अपुरे असल्याचे दिसून आले. सध्या चंद्रपूरच्या सरकारी कामगार अधिकाऱ्यांकडे गडचिरोलीचा प्रभार आहे. एकच निरीक्षक, दोन लिपीक आणि एक शिपाई नियमित आहे. उर्वरित तीन कर्मचारी कंत्राटी आहेत.
जिल्ह्यात बालकामगार नाही?
जिल्ह्यात अनेक ठिकाणी बालकामगार काम करताना दिसतात. परंतू कामगार अधिकारी कार्यालयाच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात एकही बालकामगार नाही. गेल्या मे महिन्यात याबाबतच्या धाडी टाकून तपासणी करण्यात आली. परंतू एकही बालकामगार आढळला नसल्याचे कामगार निरीक्षकांनी सांगितले.
अशा आहेत कामगारांसाठी योजना
नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत प्रतिवर्ष २५०० रूपये व आठवी ते दहावीपर्यंत प्रतिवर्षी ५००० रूपये शैक्षणिक, आर्थिक सहाय्य.
नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास दहावी व बारावीमध्ये ५० टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळाल्यास १० हजार रूपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य.
अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष १० हजार रूपये शैक्षणिक सहाय्य.
नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचा प्रवेश व पुस्तकांसाठी प्रतिवर्ष २० हजार रूपये शैक्षणिक सहाय्य.
म.जोतिबा फुले योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या आजाराच्या उपचारासाठी वैद्यकीय लाभ.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा व सुरक्षा विमा योजनेचा लाभ.