मुरूमगावात पुन्हा १२ लाख रुपयांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:47 PM2019-07-11T23:47:46+5:302019-07-11T23:48:46+5:30
धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील महिलांनी पुन्हा १२ लाख १६ हजार रुपयांची दारू गुरूवारी जप्त केली आहे. सदर दारू मुरूमगाव येथील दारू विक्रेता व्यंकटेश बहिरवार याच्या मालकीची असून त्याने ही दारू शेतातील एका खड्ड्यात माती झाकून ठेवली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरूमगाव : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील महिलांनी पुन्हा १२ लाख १६ हजार रुपयांची दारू गुरूवारी जप्त केली आहे. सदर दारू मुरूमगाव येथील दारू विक्रेता व्यंकटेश बहिरवार याच्या मालकीची असून त्याने ही दारू शेतातील एका खड्ड्यात माती झाकून ठेवली होती.
मुक्तीपथच्या नेतृत्वात मुरूमगावातील महिलांनी गाव दारूमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. ४ जुलै रोजी बहिरवार याचीच चार लाख रुपयांची दारू जप्त केली होती. त्यानंतर पुन्हा त्याने शेतातील जमिनीत दारूने भरलेले पोते गाडून ठेवले असल्याची गोपनिय माहिती महिलांना प्राप्त झाली. त्याच्या शेताची तपासणी केली असता, दारू आढळून आली. ३० चुंगळ्यांमध्ये ७ हजार ६०० बॉटल आढळून आल्या. याची किंमत १२ लाख १६ हजार रुपये होते. महिलांना बघताच बहिरवार याने पळ काढला. महिलांनी दारू पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. सदर कारवाई जि.प. सदस्य लता पुंगाटी, सरपंच प्रियंका नैताम, उपसरपंच शिवप्रसाद गवरना, मुनीर शेख, सायरा बेगम शेख, विमल मडावी, पार्वती फिरकी, सरपंच हरीश दुर्वे, पार्वती गवरना, प्रेमिला कोटपरीया, लिलाबाई धूरपुरीया, बिंदीया मडकाम, पुष्पा कोटवार, प्रतिभा उईके आदींनी केली. यासाठी मुक्तीपथचे संघटक सागर गोतपाखर, प्रेरक अक्षय पेद्दिवार, पराग मगर यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
भंगार साहित्याच्या आड दारूची वाहतूक
देसाईगंज : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मार्गे देसाईगंजकडे पिवळ्या रंगाच्या वाहनातून दारूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती देसाईगंज पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुरखेडा मार्गावरील टी पॉर्इंटजवळ सापळा रचला. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात ३६ हजार रुपये किमतीची दारू आढळून आली. वाहनाची किंमत १ लाख ५० हजार रुपये एवढी आहे. दारू व वाहन असा एकूण १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाहन चालक अनिल हजारे रा. नांदगाव खोडे ता. बल्लारशहा याच्या विरोधात देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.