महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर १२ नक्षल्यांना कंठस्नान, एक उपनिरीक्षक जखमी

By संजय तिपाले | Published: July 17, 2024 08:51 PM2024-07-17T20:51:59+5:302024-07-17T20:52:33+5:30

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हा सोडताच जंगलात ठो-ठो...

12 naxalites strangled, one sub-inspector injured on Maharashtra-Chhattisgarh border | महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर १२ नक्षल्यांना कंठस्नान, एक उपनिरीक्षक जखमी

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर १२ नक्षल्यांना कंठस्नान, एक उपनिरीक्षक जखमी

गडचिरोली : जिल्ह्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या छत्तीसगड सीमालगतच्या जंगल परिसरात १७ जुलै रोजी दुपारी २ वाजेताच्या सुमारास जवान-नक्षल्यांत चकमक उडाली. यात १२ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. एक उपनिरीक्षक जखमी आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा दौऱ्यावर होते, त्यांनी जिल्हा सोडताच  घनदाट जंगलात हा थरार घडला.

अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे स्टील निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व उद्योगमंत्री उदय सामंत हेलिकॉप्टरने आले होते. कार्यक्रम आटोपून त्यांनी जिल्हा सोडल्यानंतर एटापल्ली तालुक्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात सी ६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना इंटला गावाजवळ जंगलात दबा धरून असलेल्या नक्षल्यांनी गोळीबार सुरु केला. 

दरम्यान पोलिसांनी देखील नक्षल्यांच्या दिशेने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या चकमकीत एक पोलिस उपनिरीक्षक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलविण्यात आले असून प्रकृती धोक्याबाहेर आहे. चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम तीव्र केल्याची माहिती त्यांनी दिली. 

सहा तास सुरु होते थरारनाट्य
दरम्यान, जवान व नक्षल्यांत सहा तास थरारनाट्य चालले. रात्री ८ वाजता चकमक थांबली. त्यानंतर परिसरात शोधमोहीम घेतली असता १२ माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी ३ एके-४७, २ बंदुका, १ कार्बाईन, १ एसएलआर, ७ ऑटोमोटिव्ह शस्त्रे आढळून आली आहेत. यानंतर तेथे नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.

दोन विभागीय समिती सदस्यांचा समावेश
मृत झालेल्या १२ नक्षलवाद्यांपैकी दोघांची ओळख पटली आहे. यात टिपागड (ता. कोरची) दलमच्या विभागीय समितीचे सदस्य लक्ष्मण आत्राम, विशाल आत्राम यांचा समावेश आहे. उर्वरित दहा जणांची ओळख पटविण्याचे काम सुरु होते.

उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले ५१ लाखांचे बक्षीस
दरम्यान, गेल्या काही वर्षांतील ही सर्वांत मोठी चकमक असून गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा केली आहे. त्यांनी सी- ६० जवानांना ५१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Web Title: 12 naxalites strangled, one sub-inspector injured on Maharashtra-Chhattisgarh border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.