सिरोंचा तालुक्यातील 12 गावे करणार रिकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 05:00 AM2022-07-13T05:00:00+5:302022-07-13T05:00:24+5:30
पावसाचे पाणी काही गावात शिरण्याचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून १०९ कुटुंबातील ४४० लोकांना सुरक्षित निवाऱ्यात ठेवण्यात आले आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. मात्र नागेपल्लीत अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गावात शिरले आणि प्रशासनाला बचावकार्य मोहिम राबवावी लागली. रात्रीपासून नागेपल्ली गावातील समाक्का मंदिराजवळील नागरिक पावसाच्या पाण्यात अडकल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यात गोदावरी आणि प्राणहिता नदीला आलेला पूर आणि मेडीगड्डा धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेला धोका पाहून १२ गावातील नागरिकांना घर सोडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान पुरात अडकलेल्या अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये असलेली पूरस्थिती मंगळवारीही कायम होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पावसाचे पाणी काही गावात शिरण्याचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून १०९ कुटुंबातील ४४० लोकांना सुरक्षित निवाऱ्यात ठेवण्यात आले आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. मात्र नागेपल्लीत अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गावात शिरले आणि प्रशासनाला बचावकार्य मोहिम राबवावी लागली. रात्रीपासून नागेपल्ली गावातील समाक्का मंदिराजवळील नागरिक पावसाच्या पाण्यात अडकल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली.
पोलीस, महसूल यंत्रणा यांनी सकाळी तात्काळ एसडीआरएफ टीमला घटनास्थळी बोलविले. २५ नागरिकांना स्थानिक युवकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. नागेपल्लीमधील १७ नागरिकांना बोटीने बाहेर काढले.
अहेरीतील मुसळधार पावसामुळे दिना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. बोरी, आलापल्ली, मुक्तापूर येथे रस्ता खचल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. वेलगूर येथील मामा तलाव पावसाच्या पाण्याने फुटला होता, त्यानंतर प्रशासनाने दुरूस्ती केली. मात्र पुन्हा मंगळवारी तलाव फुटला. यामध्ये कुठेही जीवीत हानी झालेली नाही.
या गावकऱ्यांना घर सोडावे लागणार
- सिरोंचा तालुक्यातील ज्या १२ गावांमधील नागरिकांना तूर्त घर सोडण्यास सांगितले आहे त्यात सिरोंचा रै. (छोटा बाजार), सूर्यरापल्ली (सिरोंचा माल), मंडलापूर, मद्दीकुंठा, जानमपल्ली, मृदुक्रिष्णापूर, आयपेठा रै, सोमनूर माल (अंशतः), नडीकुडा, कोत्तूर रै, असरअल्ली (अंशतः), अंकिसा, कंबालपेठा टोला (अंशत:) या गावांचा समावेश आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित गावात जाऊन नागरिकांना घरे सोडण्यास सांगितले आहे.
आलापल्लीत ३२५ मिमी पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पर्जन्यमानाबाबत रेड अलर्ट देण्यात आला होता. सोमवारी रात्रीपासून मंगळवारच्या सकाळपर्यंत अहेरी तालुक्यातील आलापल्ली महसूल मंडळात ढगफुटीसदृश पाऊस झाला. तब्बल ३२५ मिलीमीटर अशा विक्रमी पावसाची नोंद झाली. असा पाऊस यापूर्वी कधीच पाहिला नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. या पावसामुळे आलापल्ली मंगळवारी जलमय झाले होते.