१० वर्षात सिकलसेलचे १२३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:05 AM2018-12-19T00:05:41+5:302018-12-19T00:06:10+5:30

पूर्व विदर्भात प्रामुख्याने आढळणाऱ्या सिकलसेल आजाराचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यातही बरेच आहे. गेल्या १० वर्षांपासून शासनाकडून हा आजार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र हा आजार अजूनही अपेक्षित प्रमाणात नियंत्रणात आलेला नाही.

123 victims of Sikkalel in 10 years | १० वर्षात सिकलसेलचे १२३ बळी

१० वर्षात सिकलसेलचे १२३ बळी

Next
ठळक मुद्देजनजागृतीवर भर गरजेचा : जिल्ह्यात सद्यस्थितीत २२४९ रुग्ण तर २८ हजार वाहक

मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पूर्व विदर्भात प्रामुख्याने आढळणाऱ्या सिकलसेल आजाराचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यातही बरेच आहे. गेल्या १० वर्षांपासून शासनाकडून हा आजार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र हा आजार अजूनही अपेक्षित प्रमाणात नियंत्रणात आलेला नाही. २००८ ते २०१८ या १० वर्षात गडचिरोली जिल्ह्यात या आजाराने १२३ लोकांचा बळी घेतला आहे. यातील ८ जण यावर्षीच्या ११ महिन्यातील आहेत.
दि.११ ते १७ डिसेंबरदरम्यान राज्यभर सिकलसेल जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. यादरम्यान अनेक ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम झाले असले तरी वर्षभर युवा वर्गात या आजाराबाबतची जनजागृती योग्य पद्धतीने होताना दिसत नाही. त्यामुळे सिकलसेलचे वाहक असणाºया युवक-युवतींमध्ये विवाह होऊन सिकलसेलग्रस्त बाळ जन्माला येत आहे. यावर्षी असे ३९ नवीन सिकलसेल रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. याशिवाय १११३ नवीन वाहक आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सिकलसेल वाहकांची संख्या २८ हजार १२५ वर पोहोचली आहे.
सिकलसेल आजाराच्या पेशी अनुवंशिक पद्धतीने पुढच्या पिढीत स्थानांतरित होतात. आजाराने ग्रस्त आणि आजाराचे वाहक अशा दोन प्रकारच्या पेशी असणारे लोक आढळतात. यातील रुग्णाला अशक्तपणा येत असल्याने त्यांना वारंवार रक्त द्यावे लागते. वाहक या प्रकारातील पेशी आढळणाऱ्या व्यक्ती स्वत: आजारी पडत नसली तरी दोन वाहक व्यक्तींमध्ये लग्न झाल्यास (पती-पत्नी) त्यांना होणारे अपत्य या आजाराने ग्रस्त आढळते. हे टाळण्यासाठी आणि आजाराचे वेळीच निदान करण्यासाठी वेळोवेळी रक्तचाचणी केली जाते.
आधी सोल्युबिलीटी चाचणी करून त्यात सिकलसेल पॉझिटिव्ह आढळळ्यास इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी करणे गरजेचे असते. परंतू अनेक दिवसांपासून या किटचा पुरवठा न करता सिकलसेल चाचणी व जनजागृतीसाठी राज्यस्तरावरून एचएलएल या कंपनीला कंत्राट देण्यात आला आहे.
सरकारी यंत्रणेवर सरकारचाच अविश्वास
ज्या एचएलएल या कंपनीकडे सिकलसेल तपासणीसाठी रक्तनमुने घेण्याचे आणि सर्वत्र जनजागृती करण्याचे काम दिले त्या कंपनीकडे अपुरे मनुष्यबळ आहे. या कंपनीचे स्वयंसेवक रक्तनमुने घेतल्यानंतर स्थानिक स्तरावर तत्काळ निदान होणारी सोल्युबिलीटी चाचणी आधी न करता थेट रक्तनमुने नागपूर येथील आपल्या प्रयोगशाळेत पाठवितात. नंतर त्या नमुन्यांचा अहवाल एकत्रितपणे या कंपनीकडून आरोग्य विभागाला पाठविला जातो. यात अहवाल येण्यास विलंब होतो. वास्तविक जिल्ह्याच्या सरकारी आरोग्य यंत्रणेकडे स्थानिक स्तरावर प्रयोगशाळा आणि मनुष्यबळ असताना त्यांना डावलून खासगी कंपनीकडून केल्या जात असलेल्या या कामावर जास्त विश्वास आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात रक्तपेढींची कमतरता
सिकलसेलग्रस्त रुग्णाला वारंवार रक्तपुरवठा करावा लागतो. परंतू जिल्ह्यात तालुकास्तरावर सर्वत्र रक्तपेढींची सुविधा नाही. दुर्गम भागातील रुग्णाला वारंवार रक्त घेण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात येणे शक्य नसल्यामुळे गावातच त्याचा मृत्यू ओढवतो. हे टाळण्यासाठी प्रमुख तालुक्यांच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांमध्ये रक्तपेढीची सुविधा देण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: 123 victims of Sikkalel in 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य