१२५ गावांचा भामरागडशी संपर्क तुटला
By admin | Published: September 18, 2015 01:10 AM2015-09-18T01:10:56+5:302015-09-18T01:10:56+5:30
गुरूवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात गडचिरोली जिल्ह्यामध्ये ७४.८३ मिमीच्या सरासरीने ८९२.६० मिलीमीटर पाऊस झाल्याने भामरागड गावात पाणी घुसले आहे.
नद्या तुडुंब भरल्या : आलापल्ली मार्गावरची वाहतूक ठप्प
गडचिरोली : गुरूवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात गडचिरोली जिल्ह्यामध्ये ७४.८३ मिमीच्या सरासरीने ८९२.६० मिलीमीटर पाऊस झाल्याने भामरागड गावात पाणी घुसले आहे. संपूर्ण भामरागड जलमय झाले असून पर्लकोटा, इंद्रावती, पामुलगौतम या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आलापल्ली-भामरागड मार्गावरील पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी आल्याने आलापल्ली मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. भामरागड तालुक्यातील सव्वाशे गावांचा जिल्हा व तालुका मुख्यालयाशीही संपर्क तुटलेला आहे.
भामरागडचा विद्युत पुरवठा मागील दोन दिवसांपासून बंद पडला होता. तो गुरूवारी २.४५ वाजता पूर्ववत सुरू झाला. भामरागड गावातील राजे विश्वेश्वरराव चौकापर्यंत पुराचे पाणी घुसले आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड धावाधाव सुरू आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. २४ तासात ७४.८८ मिमी पावसाची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे. भामरागड येथील पर्लकोटाच्या पुलावरून चार फूट पाणी वाहत आहे. कोरची, भामरागडची मोबाईल सेवाही वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे ठप्प झाली आहे. या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून जिल्ह्यात आठ तालुक्यात अतिवृष्टी झाली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कृष्णा रेड्डी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. कुरखेडा येथे ११४ मिमी, कोरची १०९, देसाईगंज ९७.५, अहेरी ९१, चामोर्शी ८३, आरमोरी ७८, भामरागड ७०.५, धानोरा ६५.४, सिरोंचा ५७.४, गडचिरोली ५४.२, मुलचेरा ४२.२, एटापल्ली ३०.४ मिमी पाऊस झाला, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
वैरागड-मानापूर, धानोरा-रांगी मार्ग बंद; अनेक तालुक्यात वीज पुरवठा खंडीत
वैलोचना नदीच्या पुलावरुन तीन फूट पाणी वाहू लागल्याने वैरागड- मानापूर(देलनवाडी) हा मार्ग बंद झाला आहे. बुधवारी दुपारी बहुतांश भागात पाऊस बरसला. त्यानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर रात्री पुन्हा पाऊस बसरला. गुरूवारी सकाळपासून पाऊस बरसत असल्याने नदी, नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. अनेक भागातील वीज पुरवठाही बंद आहे. वैरागडनीजकच्या वैलोचना नदीच्या पुलावरुन तीन फूट पाणी वाहू लागल्याने हा मार्ग बंद आहे. धानोरा-रांगी मार्गावरील सोडे नदीच्या पुलाजवळ बुधवारच्या रात्री झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दुपारी ३ वाजेपर्यंत ठप्प पडली होती.
पलसगड येथे अतिवृष्टीमुळे झाड कोसळले; कुरखेडा मार्ग बंद
कुरखेडा तालुक्यातील पलसगड येथे अतिवृष्टीमुळे झाड कोसळल्याने कुरखेडा मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे. खेडेगाव-पलसगड मार्गावरची वाहतूकही ठप्प झाली आहे.
गोसेखुर्दचे २४ दरवाजे उघडल्याने नद्या फुगणार
बुधवारी भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे २४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर प्रचंड वाढला असून कठाणी व अन्य उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत. गडचिरोली येथे बुधवारी रात्रीपासून पाऊस सुरू असल्याने गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी बाजाराकडे फिरकणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामाना करावा लागला. गुरूवारी दिवसभर संततधार पाऊस राहिल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले होते.