आलीया गावात अजब वरात... गोंडी मंगलाष्टकांनी १२७ जोडप्यांची लग्नगाठ

By संजय तिपाले | Published: March 26, 2023 10:41 AM2023-03-26T10:41:27+5:302023-03-26T10:41:50+5:30

आठ आत्मसमर्पित नक्षलींचा समावेश: पोलिस दल, मैत्री परिवार संस्थेचा उपक्रम

127 couples were married by gondi mangalashtak in gadchiroli | आलीया गावात अजब वरात... गोंडी मंगलाष्टकांनी १२७ जोडप्यांची लग्नगाठ

आलीया गावात अजब वरात... गोंडी मंगलाष्टकांनी १२७ जोडप्यांची लग्नगाठ

googlenewsNext

संजय तिपाले/गडचिरोली : आदिवासी गोंडी समाजाच्या पुरातन चालीरीती व परंपरेनुसार २६ मार्चला शहरात १२७ जोडप्यांची लग्नगाठ बांधली जात आहे. सकाळी ९ वाजता शहरातून पारंपरिक पद्धतीने निघालेल्या वरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आठ आत्मसमर्पित नक्षली जोडपीही यावेळी विवाहबद्ध होत आहेत. 

जिल्हा पोलिस दल व नागपूर येथील मैत्री परिवार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एकाच मांडवात होत असलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे शहर गजबजून गेले आहे. पिपाणीचा लयबद्ध सूर.. ढोलताशांचा गजरात मूल रोडवरील मंगल कार्यालयातून वरातीला सुरुवात झाली. हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावर वरात मुख्य व्यापारपेठेतून इंदिरा गांधी चौकातून पुन्हा लग्नमंडवात पोहोचली. गोंडी मंगलाष्टकांनी हा सोहळा पार पडत आहे. यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांची उपस्थिती आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, निरंजन वासेकर, दिलीप ठाकरे, मंजूषा जोशी, अश्विनी भांडकेर आदी यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.

महिलांकडून पुष्पवृष्टी, पोलिस थिरकले

वरातीच्या मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या.शहरातून वरात निघाली तेव्हा महिलांनी घराबाहेर पडून कैतुकाने वधू- वरांवर पुष्पवृष्टी केली. वरातीत नातेवाईकांची पाऊले थिरकली. यावेळी पोलिसांनाही ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही.

जोडप्यांना प्रशिक्षण, देणार रोजगार

लग्नानंतर पोलिस प्रशासनाकडून जोडप्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांचे संसार उभे करण्यात सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे. पोलिस दलाकडून आदिवासींच्या उत्थानासाठी दादालोरा खिडकी या उपक्रमातून विविध योजना राबविल्या जातात. 

जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य

वधूला डोरले, मंगळसूत्र, वधू-वरांना नवे कपडे, संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. जोडप्यांच्या आई-वडिलांना आहेर दिला  आहे. वऱ्हाडींच्या मिष्ठान्न भोजनाची सोय केली जाणार आहे.

लग्नाला साडेतीन हजारांवर वऱ्हाडी

विवाह सोहळ्यासाठी ५०० बाय ८० चौरस जागेत चार वेगवेगळे मंडप उभारले आहेत. यात साडेतीन हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. १२७ जोडप्यांचे दहा झोनमध्ये विभाजन केले आहे. मुख्य मंडपाला वीर बिरसा मुंडा, आदिवासी बांधवांच्या भोजनकक्षाला क्रांतिवीर बाबूराव शेडमाके व मान्यवरांच्या भोजनकक्षाला वीर नारायण सिंह यांचे नावे असून वधू- वर भोजन कक्षास वीर राणी दुर्गावती असे नाव दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: 127 couples were married by gondi mangalashtak in gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.