१२८ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:15 AM2018-12-15T01:15:06+5:302018-12-15T01:15:33+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण रूग्णालय धानोराच्या वतीने १३ ते १६ डिसेंबरदरम्यान आरोग्य व दंतशिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन समाजसेवक देवाजी तोफा यांच्या हस्ते गुरूवारी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण रूग्णालय धानोराच्या वतीने १३ ते १६ डिसेंबरदरम्यान आरोग्य व दंतशिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन समाजसेवक देवाजी तोफा यांच्या हस्ते गुरूवारी झाले. सदर शिबिरात तपासणी व औषधोपचारासाठी एकूण १ हजार २१ रूग्णांनी नोंदणी केली.
उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती अजमन राऊत, नगराध्यक्ष लिना साळवे, न.पं. आरोग्य सभापती वंदना उंदीरवाडे, तहसीलदार महेंद्र गणवीर, सीआरपीएफच्या ११३ बटालियनचे उपकमांडंट प्रमोद सिरसाट, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा महिला व बाल रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम, डॉ. बागराज धुर्वे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी, शशिकांत साळवे, साईनाथ साळवे, डॉ. संतोष खोब्रागडे, डॉ. सतिश गांगुर्डे, डॉ.मंजुषा लेपसे, डॉ.सीमा गेडाम आदी उपस्थित होते.
४३ वेळा रक्तदान करणारे प्रदीप श्रीपदवार, ४५ वेळा रक्तदान करणारे गजानन परचाके व ३३ वेळा रक्तदान करणारे अरूण कोवे यांचा सदर शिबिरात शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शिबिरात ६७ रूग्णांची दंत तपासणी करण्यात आली. ५८ लोकांना क्ष-किरण सेवेचा लाभ देण्यात आला. २९७ नेत्र रूग्णांची तपासणी करण्यात आली व यापैकी ६५ रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. नेत्र वगळता इतर आजारग्रस्त ६३ रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन गौरी साळवे, प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र सावसाकडे यांनी केले तर आभार गिरीष लेनगुरे यांनी मानले.
सहा महिन्यांत उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळणार -डॉ. होळी
सुदृढ भारत निर्माण करण्यासाठी सर्वांचे आरोग्य निकोप व निरोगी असणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांकडून प्रयत्न झाले पाहिजे. येत्या सहा महिन्यात धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळणार असून धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळणार आहे. याबाबतचे प्रयत्न सुरू झाले आहे, अशी माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी अध्यक्षीय भाषणातून दिली. आयुष्यमान योजनेचा सर्व नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे. आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तळागाळातील रूग्णांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन डॉ. होळी यांनी यावेळी केले.