१३ नक्षलींचा खात्मा; कमांडर-उपकमांडरचा समावेश, सर्वांवर मिळून होते ६० लाखांचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 07:39 AM2021-05-22T07:39:38+5:302021-05-22T07:39:57+5:30
दीड तास चाललेल्या चकमकीत १३ नक्षलवादी मारले गेले. याशिवाय ४ ते ५ नक्षलवादी जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यांतर्गत कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैडी जंगल शिवारात पोलीस पथक व नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार चकमक उडाली. यात १३ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यात ६ पुरुष तर ७ महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये १६ लाखांचे बक्षीस असलेल्या कंपनी-४ च्या विभागीय समिती सदस्यासह इतर जहाल नक्षल्यांचा समावेश आहे. यांच्यावर शासनाने ६० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. गेल्या तीन वर्षांतील ही सर्वांत मोठी चकमक ठरली आहे.
तेंदूपत्ता हंगामाच्या पार्श्वभूमीवर खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने पैडी जंगलात नक्षलवादी एकत्र आले होते. हे समजताच पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, एएसपी (प्रशासन) समीर शेख, एएसपी (अहेरी उपमुख्यालय) सोमय मुंडे आणि एसडीपीओ (अभियान) भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनात सी-६० पथकाने शोधमोहीम सुरू केली. जंगलात दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांवर गोळीबार केला. पोलिसांनी शरण येण्याचे केलेले आवाहन नक्षलवाद्यांनी जुमानले नाही.
तीन वर्षांतील सर्वात मोठी चकमक
यापूर्वी २२ आणि २३ एप्रिल २०१८ रोजी भामरागड तालुक्यातील कसनसूरच्या जंगलात आणि अहेरी तालुक्यातील नैनर परिसरात झालेल्या दोन चकमकींमध्ये ४० नक्षलवादी मारले गेले होते. ती नक्षलविरोधी अभियानातील देशातील सर्वात मोठी चकमक ठरली होती. त्यानंतर अधूनमधून अनेक चकमकी होऊन नक्षलवादी मारलेही गेले. पण एकावेळी १३ नक्षलवादी मारले जाण्याची ही घटना गेल्या तीन वर्षांतील पहिलीच आहे.
‘त्या’ १६ शहीद जवानांना आदरांजली
या कारवाईनंतर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी २००९ मध्ये याच दिवशी (२१ मे) नक्षलवाद्यांनी हिंसक कारवायात १६ पोलीस जवानांचा बळी घेतल्याच्या घटनेला उजाळा दिला. आता त्यांच्या बलिदानाच्या दिवशीच १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले गेल्याने एकप्रकारे त्या शहीद जवानांसाठी ही आदरांजलीच ठरली असल्याचे ते म्हणाले.
एके-४७, स्टेनगन आणि स्फोटकेही जप्त
मृत नक्षलवाद्यांजवळून एके-४७ रायफल, ५ नग एसएलआर, स्टेनगन, ३ नग ३०३ रायफल, २ नग ८ एमएम रायफल, एक पिस्टल आणि बऱ्याच प्रमाणात स्फोटकेही जप्त करण्यात आली. त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरात येणारे साहित्यही घटनास्थळी मिळाले. सर्व मृतदेह गडचिरोलीत आणून आत्मसमर्पित नक्षल्यांच्या माध्यमातून त्यांची ओळख पटविण्यात आली.
गृहमंत्री-पालकमंत्र्यांकडून कौतुक
नक्षलविरोधी अभियानातील पोलिसांच्या या कारवाईचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोलीला भेट देऊन कौतुक केले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतून व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून पोलीस दलाच्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.