गडचिरोलीत १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान; कमांडर-उपकमांडरचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 08:13 PM2021-05-21T20:13:22+5:302021-05-21T20:28:50+5:30

13 Naxals killed in Encounter : कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैडी जंगल शिवारात पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार चकमक उडाली.

13 Naxals killed in encounter with security forces in Maharashtra's Gadchiroli | गडचिरोलीत १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान; कमांडर-उपकमांडरचा समावेश

गडचिरोलीत १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान; कमांडर-उपकमांडरचा समावेश

Next

गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याअंतर्गत कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैडी जंगल शिवारात पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार चकमक उडाली. यात १३ नक्षलवाद्यांचा पोलिसांच्या गोळीने वेध घेतला. त्यापैकी ६ पुरुष तर ७ महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये १६ लाखांचे बक्षीस असलेल्या कंपनी-४ च्या विभागीय समिती सदस्यासह इतर जहाल नक्षल्यांचा समावेश आहे. या सर्वांवर मिळून शासनाने ६० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. गेल्या तीन वर्षातील ही सर्वात मोठी चकमक ठरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेंदुपत्ता हंगामाच्या पार्श्वभूमीवर खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने पैडी जंगलात नक्षलवादी एकत्र आले होते. याची कुणकुण पोलिसांना लागताच पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनिष कलवानिया, एएसपी (प्रशासन) समीर शेख, एएसपी (अहेरी उपमुख्यालय) सोमय मुंडे आणि एसडीपीओ (अभियान) भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचे सी-६० पथक यांनी शोधमोहीम सुरू केली. सकाळी ६ च्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांवर गोळीबार केला. पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले, पण त्याला प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी जोरदार हल्ला चढविला. दीड तास चाललेल्या चकमकीत १३ नक्षलवादी मारले गेले. याशिवाय ४ ते ५ नक्षलवादी जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

मृत नक्षलवाद्यांजवळून एके-४७ रायफल, ५ नग एसएलआर, स्टेनगन, ३ नग ३०३ रायफल, २ नग ८ एमएम रायफल, एक पिस्टल आणि बऱ्याच प्रमाणात स्फोटकेही जप्त करण्यात आली. त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरात येणारे साहित्यही घटनास्थळी मिळाले. सर्व मृतदेह दुपारी गडचिरोलीत आणून आत्मसमर्पित नक्षल्यांच्या माध्यमातून त्यांची ओळख पटविण्यात आली.

मृतांमध्ये यांचा समावेश

चकमकीतील मृत नक्षलवादी आणि त्यांचे पद पुढीलप्रमाणे आहे. सतीश उर्फ अडवे देवू मोहंदा (डीव्हीसीएम), नंदिनी उर्फ प्रेमबत्ती मडावी (एसीएम), किशोर उर्फ शिवा उर्फ शिवाजी बारसू गावडे (पीएम), रुपेश उर्फ लिंगा मस्तारी गावडे (उपकमांडर), सेवंती हेडो (पीएम), किशोर होळी (जनमिलिशिया), क्रांती उर्फ मैना उर्फ रिना माहो मट्टामी (पीएम), गुनी उर्फ बुकली धानू हिचामी (पीपीसीएम), रजनी ओडी (पीएम), उमेश परसा (एसीएम), सगुना उर्फ वसंती उर्फ वत्सला लालू नरोटी (पीएम), सोमरी उर्फ सुनिता उर्फ सविता पापय्या नैताम (सदस्य), रोहीत उर्फ मनेश उर्फ मानस उर्फ सोनारू सन्नू कारामी (पीएम)

तीन वर्षांतील सर्वात मोठी चकमक

यापूर्वी २२ आणि २३ एप्रिल २०१८ रोजी भामरागड तालुक्यातील कसनसूरच्या जंगलात आणि अहेरी तालुक्यातील नैनर परिसरात झालेल्या दोन चकमकींमध्ये ४० नक्षलवादी मारले गेले होते. ती नक्षलविरोधी अभियानातील देशातील सर्वात मोठी चकमक ठरली होती. त्यानंतर अधूनमधून अनेक चकमकी होऊन नक्षलवादी मारलेही गेले. पण एकावेळी १३ नक्षलवादी मारले जाण्याची ही घटना गेल्या तीन वर्षातील पहिलीच आहे.

गृहमंत्री-पालकमंत्र्यांकडून कौतुक

नक्षलविरोधी अभियानातील पोलिसांच्या या कारवाईचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोलीला भेट देऊन कौतुक केले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतून व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून पोलीस दलाच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.

‘त्या’ १६ शहीद जवानांना आदरांजली

या कारवाईनंतर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी २००९ मध्ये याच दिवशी (२१ मे) नक्षलवाद्यांनी हिंसक कारवायात १६ पोलीस जवानांचा बळी घेतल्याच्या घटनेला उजाळा दिला. आता त्यांच्या बलिदानाच्या दिवशीच १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्या गेल्याने एक प्रकारे त्या शहीद जवानांसाठी ही आदरांजलीच ठरली असल्याचे ते म्हणाले.
 

Web Title: 13 Naxals killed in encounter with security forces in Maharashtra's Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.