१३ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:00 AM2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:00:44+5:30
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दुकाने, सेवा, आस्थापना, प्रवास पूर्णपणे प्रतिबंधित राहील. या भागात वैद्यकीय सेवेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना प्रवेश अनुज्ञेय राहील. अन्नधान्य, भोजन यांचा पुरवठा करायचा असेल तर तहसीलदारांची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आहे. या क्षेत्रात कोणत्याही व्यक्ती किंवा वाहनाला ये-जा करण्यास मनाई राहणार आहे. जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक विभागावर याबाबतची जबाबदारी सोपविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात सोमवारी पाच व मंगळवारी पुन्हा एक कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला आहे. आरमोरी (शंकरनगर) येथील विलगिकरण कक्षात असलेल्या या रुग्णाचा रिपोर्ट मंगळवारी संध्याकाळी मिळाला. सोमवारी आढळलेल्या ५ रुग्णांच्या संपर्कातीलच तो असल्याचे आरोग्य विभागाने कळविले. दरम्यान कोरोनाबाधित रुग्णांच्या वास्तव्याचे ठिकाण लक्षात घेऊन कुरखेडा, चामोर्शी व मुलचेरा तालुक्यातील मिळून एकूण १३ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दुकाने, सेवा, आस्थापना, प्रवास पूर्णपणे प्रतिबंधित राहील. या भागात वैद्यकीय सेवेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना प्रवेश अनुज्ञेय राहील. अन्नधान्य, भोजन यांचा पुरवठा करायचा असेल तर तहसीलदारांची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आहे. या क्षेत्रात कोणत्याही व्यक्ती किंवा वाहनाला ये-जा करण्यास मनाई राहणार आहे. जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक विभागावर याबाबतची जबाबदारी सोपविली आहे.
पोलीस विभागामार्फत या परिसराच्या सीमांची नाकाबंदी केली जाईल. या क्षेत्रात येणारे पेट्रोलपंप, बँक, रेशन दुकान सुध्दा बंद राहतील. प्रतिबंधित क्षेत्राच्या जवळच्या परिसरातही गर्दी होणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रात पूर्णवेळ पेट्रोलिंग करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची खबरदारी पोलिसांमार्फत घेतली जाईल. संबंधित तालुक्याचे तहसीलदार प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना दुध, भाजीपाला, अंडी, किराणा, औषधी घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठाधारक निश्चित करून त्यांना मार्गदर्शन करतील. अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांना हिरव्या परवान्यांचे वाटप करणे, अप्रत्यक्षरित्या काम करणाऱ्यांना पिवळे परवाने तर अन्य कर्मचाऱ्यांना लाल परवाने देतील. प्रतिबंधित क्षेत्रातील काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या राहणे, जेवने व ने-आण करणाऱ्यांची स्वतंत्र सोय तहसीलदार करतील. पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँक, शाळा, गोटूल, मंगल कार्यालय, समाजभवन, बसस्थानक, चौक, बाजारपेठ, गर्दीच्या ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी केली जाईल. याकरिता लागणारे मनुष्यबळ व साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पंचायत समितीवर राहिल.
आरोग्य विभागामार्फत दरदिवशी सर्वेक्षण केले जाईल. सर्वेक्षण चमूमध्ये अंगणवाडी कार्यकर्ता, आशा कार्यकर्ता, आशा गटप्रवर्तक, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी यांची निवड केली जाईल. त्यांना सर्वेक्षणाची पध्दती व स्वत:ची काळजी घेणे याविषयी प्रशिक्षीत केले जाईल. सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत किमान ५० घरांचे सर्वेक्षण केले जाईल. पुढील १४ दिवस अशा प्रकारचे सर्वेक्षण केले जाईल. दररोजचा अहवाल पर्यवेक्षकांकडे सादर करणे बंधनकारक आहे. सर्वेक्षणादरम्यान एखाद्या व्यक्तीला ताप, खोकल्याची सौम्य लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीला ताबडतोब १०२ रूग्णवाहिकेने तालुकास्तरीय सीसीसी मध्ये पाठवावे. मध्यम स्वरूपाची (ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास) लक्षणे आढळल्यास त्याला तालुकास्तरीय डीसीएचसीमध्ये पाठविले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. आदेशांचे उल्लंघन करणाºयांवर साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये दंड आकारला जाईल.
जिल्हाधिकाऱ्यांची आमगाव केंद्राला भेट
जिल्हाधिकारी दीपक सिंगला व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आमगाव येथील कारमेल अकॅडमी येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षाला भेट दिली. येथील सुविधांबाबत चर्चा केली. विलगीकरण कक्षाचे वारंवार सॅनिटायझेशन करावे. स्वच्छता बाळगावी. पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. वारंवार आरोग्य तपासणी करावी, अशा सूचना स्थानिक प्रशासनाला जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
हे आहेत प्रतिबंधित क्षेत्र
प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या ठिकाणांमध्ये कुरखेडा शहरातील शासकीय मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहाचा परिसर, गांधी वार्ड, संपूर्ण येंगलखेडा, नेहारपायली व चिचेवाडा गाव यांचा समावेश आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा व जवळपासचा संपूर्ण परिसर, मुलचेरा तालुक्यातील विश्वनाथ नगर येथील काही भागाचा समावेश आहे. आरमोरीत आणखी एक रुग्ण वाढल्यामुळे तेथील शंकरनगरचा परिसरही प्रतिबंधित क्षेत्र घोषित होऊ शकतो.
नियम मोडणाºयांवर दंडासह फौजदार कारवाई
प्रशासनाची परवानगी न घेताच दुसºया राज्यातून किंवा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाºया वाहन मालकावर एक लाख रुपयांचा दंड, तसेच कोणत्याही मार्गाने प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच विलगीकरण कक्षात राहण्यासाठी नेमून दिलेला कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच अनधिकृतरित्या बाहेर पडल्यास संबंधित व्यक्तीवर पाच हजार रुपये दंड आकारला जाईल. प्रतिबंधित क्षेत्रातून बेकायदेशीररित्या बाहेर पडल्यास किंवा प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्यास सदर व्यक्तीवर पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार तहसीलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
विलगीकरणासाठी आणखी इमारती अधिग्रहित
कोरोना संशयित रूग्णांना ठेवण्यासाठी प्रशासनाने जिल्हाभरातील काही इमारती अधिग्रहित केल्या आहेत. यामध्ये गोंडवाना सैनिकी विद्यालय वाकडी (गडचिरोली), जवाहर भवन जि.प.गडचिरोली, गोंडवाना विद्यापीठाचे वसतिगृह, शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे वसतिगृह, कृषी महाविद्यालय सोनापूर कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह, धानोरा तालुक्यातील कारवाफा येथील शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह, तोडे येथील शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह, पेंढरी येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह, मॉडेल स्कूल मोहली, चामोर्शी तालुक्यात शासकीय धर्मशाळा मार्र्कंडादेव, मुलचेरा तालुक्यात आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह मुलचेरा, भगवंतराव माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा मुलचेरा, ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वसतिगृह मुलचेरा, अहेरी तालुक्यात वन विश्रामगृह आलापल्ली, कुरखेडा तालुक्यात गोविंदराव मुनघाटे विद्या, कला व विज्ञान महाविद्यालय, कुरखेडा , शासकीय आदिवासी मुला/मुलींची आश्रमशाळा येंगलखेडा, कोरची येथील आदिवासी मुलींची आश्रमशाळा यांचा समावेश आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.