१३ हजार विद्यार्थी गणवेशाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:01 PM2018-01-21T23:01:31+5:302018-01-21T23:01:42+5:30

शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर असतानाही सुमारे १२ हजार ७५३ विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे गणवेशाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

13 thousand students without uniform | १३ हजार विद्यार्थी गणवेशाविनाच

१३ हजार विद्यार्थी गणवेशाविनाच

Next
ठळक मुद्देसत्र संपण्याच्या मार्गावर : गडचिरोली जिल्ह्यात शिक्षण विभागाचा नवोपक्रम सपशेल अयशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर असतानाही सुमारे १२ हजार ७५३ विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे गणवेशाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केला नसल्याचे स्पष्ट होत आहे. ६२ हजार ८८१ एकूण गणवेशाचे लाभार्थी असून त्यापैकी १८ जानेवारीपर्यंत ५० हजार १२८ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात गणवेशाच्या अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने ही योजना फसली असल्याचा आरोप होत आहे.
यापूर्वी प्रत्येक शाळेच्या बँक खात्यात लाभार्थी संख्येनुसार गणवेशाची रक्कम जमा केली जात होती. शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक विचार विनिमय करून विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करीत होते. मात्र गणवेश खरेदीत काही शाळांमध्ये गैरव्यवहार झाल्याची प्रकरणे उघडकीस आली. त्यानंतर शासनाने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये गणवेशाच्या अनुदानाची रक्कम जमा करण्याचा निर्णय यावर्षीपासून घेतला.
गणवेशाचे लाभार्थी पहिली ते आठव्यावर्गापर्यंतचे विद्यार्थी आहेत. यातील अपवाद वगळता बहुतांश विद्यार्थ्यांचे बँक खाते नव्हते. बँक खाते उघडण्यासाठी शिक्षण विभागाने शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच तयारी सुरू केली. पालकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात आली. ठिकठिकाणी बँकांच्या मार्फत स्वतंत्र शिबिर घेऊन विद्यार्थ्यांचे बँक खाते काढण्यात आले. मात्र या प्रक्रियेला पाहिजे त्या प्रमाणात गती मिळाली नाही. १५ आॅगस्टपूर्वी सर्व विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये गणवेश अनुदानाची रक्कम जमा करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले होते. मात्र पहिला सत्र संपला आहे. दुसरा सत्रही संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र अजुनपर्यंत केवळ ७९.७२ टक्के लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण १ हजार ५७३ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण ६२ हजार ८८१ विद्यार्थी आहेत. यापैैकी ५४ हजार ५११ विद्यार्थ्यांनी बँक खाते काढले. मात्र त्यापैैकी ५० हजार १२८ विद्यार्थ्यांच्याच बँक खात्यात गणवेश अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. एकूण लाभार्थ्यांच्या हे प्रमाण केवळ ७९.७२ टक्के आहे. बहुतांश गरीब पालक शासनाकडून प्राप्त होणाºया रकमेतून गणवेश खरेदीची अपेक्षा बाळगून होते. मात्र रक्कम उपलब्ध झाली नसल्याने आपल्या पाल्याला गणवेश खरेदी करून दिला नाही. गणवेश खरेदी केल्यानंतर त्याचे बिल मुख्याध्यापकांकडे सादर करायचे होते. त्यानंतर मुख्याध्यापक संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात पैसे जमा करणार होते. मात्र अनेक पालकांकडे नगदी पैसे नसल्याने त्यांनी गणवेश खरेदी केला नाही. व गणवेशाची रक्कमसुद्धा बँक खात्यात जमा केली नाही.
बँकांचा ठरला अडसर
विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर ती काही दिवसांतच पूर्णपणे काढून खाता अगदी रिकामा केला जातो. परिणामी या खात्यातून बँकेला पाहिजे त्या प्रमाणात फायदा मिळत नाही. त्यामुळे बहुतांश राष्ट्रीयकृत बँका विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यास तयार होत नाही. गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांची संख्या ही कमी आहे. काही गावांचे तालुक्यापासूनचे अंतर सुमारे ५० ते १०० किमीच्या जवळपास आहे. एवढे अंतर पार करून आल्यानंतरही बँक खाते निघेलच याची शाश्वती राहत नाही. प्रवास खर्च, पालकाची बुडालेली मजुरी लक्षात घेतली तर बँक खाते काढण्याचा खर्च १ हजाराच्या जवळपास येत होता. त्यामुळे अनेक पालकांनी बँक खाते न काढण्याचाच निर्णय घेतला. त्यामुळे बँक खाते निघाले नाही.
जिल्हाभरातील ८ हजार ३७० विद्यार्थ्यांनी बँक खाते काढण्यासाठी बँकेकडे अर्ज केला. त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रही सादर केले. मात्र या विद्यार्थ्यांना अजुनपर्यंत बँक खाते क्रमांक देण्यात आले नाही. क्रमांकच न मिळाल्याने सदर विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेशाची रक्कम जमा करण्यास अडचण येत आहे.

Web Title: 13 thousand students without uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.