बलात्काऱ्यास १३ वर्षांचा सश्रम कारावास
By admin | Published: September 15, 2016 01:54 AM2016-09-15T01:54:59+5:302016-09-15T01:54:59+5:30
एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या युवकास येथील विशेष सत्र न्यायालयाने १३ वर्षांच्या सश्रम
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे शोषण
गडचिरोली : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या युवकास येथील विशेष सत्र न्यायालयाने १३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सनातन ऊर्फ सोनू बिमल बिश्वास (२४) रा. मुलचेरा असे आरोपी युवकाचे नाव आहे.
११ जून २०१५ रोजी आरमोरी तालुक्यातील वघाळा येथील १५ वर्षीय पीडित मुलगी आपल्या घरी एकटीच असताना आरोपी सनातन ऊर्फ सोनू बिश्वास तिच्या घरी गेला. त्याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला चंद्रपूर व भद्रावती येथील आपल्या नातेवाईकाच्या घरी नेले. त्यानंतर त्याने पीडितेला भद्रावती येथील मंदिरात नेऊन तिच्या कपाळावर कुंकू लावून लग्न करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर १४ जूनपर्यंत आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पुढे पीडित मुलीच्या तक्रारीनंतर आरमोरी पोलिसांनी आरोपी सनातन ऊर्फ सोनू बिश्वास याच्यावर भादंवि कलम ३६३, ३६६, ३७६ (अ) व बालकाच्या लैंगिक अत्याचार कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. पीएसआय पंकज दाभाडे यांनी प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. बुधवारी विशेष सत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी सर्व साक्ष पुरावे तपासल्यानंतर सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी सनातन बिश्वास यास कलम ३६३ व कलम ३६६ अन्वये प्रत्येकी ३ वर्षांचा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा व कलम ३७६ अन्वये ७ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)