१३०० किमीचे रस्ते खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:16 PM2017-11-17T23:16:18+5:302017-11-17T23:16:58+5:30
गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित एकूण २ हजार १५० किमी रस्ते आहेत.
दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित एकूण २ हजार १५० किमी रस्ते आहेत. त्यापैकी सुमारे १ हजार ३०० किमी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाळा संपताच सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. जास्त पावसामुळे व पुराचे पाणी दोन ते तीन दिवस वाहत राहिल्यास डांबरी रस्त्यांवरील डांबर निघून त्यावर खड्डे पडतात. डांबरी रस्त्यांची ही सर्वात मोठी कमजोरी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्ग आहेत. ग्रामीण नागरिकांकडूनही डांबरी रस्ता बांधण्याची मागणी होत असल्याने एकूण रस्त्यांपैकी बहुतांश रस्ते डांबराचे आहेत.
पावसाळा संपल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या पाहणीस सुरूवात केली. त्यावेळी एकूण रस्त्यांपैकी सुमारे १ हजार ३०० किमीच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणचे डांबर पूर्णपणे उखडून गेले असल्याचे दिसून आले. राज्य शासनाने १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त रस्ते करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. जिल्हाभरात ८५ युनिट खड्डे बुजविण्याचे काम करीत असून आजपर्यंत खड्डे बुजविण्याचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त गडचिरोली जिल्हा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते.
११ कोटी रूपये निधीची मागणी
सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यासाठी राज्य शासनाकडे १० कोटी ८५ लाख रूपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यापैकी ५ कोटी ५० लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. उर्वरित निधी सुध्दा लवकरच उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
१७५ किमी रस्त्यांचे नूतनीकरण
सार्वजनिक बांधकाम विभागाने १७५ किमी रस्त्यांचे नूतनीकरण करण्यास मंजुरी प्रदान केली आहे. यासाठी ३५ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. जारावंडी-कसनसूर, गोमणी, घोट, कोरची-छत्तीसगड राज्य सीमा, गडचिरोली-चांदाळा, कुरखेडा-कढोली, मौशीखांब-वडधा, शंकरपूर-गोंदिया सीमा, परसवाडी-कुराडी, भेंडाळा-गणपूर, गडचिरोली-ठाकरी, अहेरी-महागाव या मार्गांचा समावेश आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त रस्ते तयार करण्यासाठी बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहे. सद्य:स्थितीत खड्डे बुजविण्याचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. राज्य शासनाकडून पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असल्याने निधीची टंचाई नाही. काम वेळेच्या आत व्हावे यासाठी सुमारे ८५ युनिट जिल्हाभरात खड्डे बुजविण्याचे काम करीत आहेत.
- प्रदीप खवले, अधीक्षक अभियंता, साबांवि गडचिरोली