जिल्हाभरात 13 हजार विद्यार्थी देणार आजपासून बारावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 05:00 AM2022-03-04T05:00:00+5:302022-03-04T05:00:31+5:30
गडचिराेली जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ४८ मुख्य, तर १२८ उपकेंद्र ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारला पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे. या परीक्षा केंद्रावर रनर हा कस्टडीमधून केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचिवणार आहे व परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका घेऊन कास्टडीमध्ये पोहोचवण्याचे काम करणार आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे परीक्षा केंद्रावर सॅनिटायझर ठेवण्याच्या सूचना बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे यावर्षी इयत्ता दहावी व बारावीच्या बाेर्डाच्या परीक्षा प्रत्यक्ष घेण्यात येणार आहे. दि. ४ मार्च शुक्रवारपासून बारावीची परीक्षा सुरू हाेत आहे. काेराेनाचा संसर्ग वाढू नये, तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी परीक्षा केंद्र व उपकेंद्रावर विविध सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. खबरदारी घेण्यात येत आहेत.
गडचिराेली जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ४८ मुख्य, तर १२८ उपकेंद्र ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारला पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे. या परीक्षा केंद्रावर रनर हा कस्टडीमधून केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचिवणार आहे व परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका घेऊन कास्टडीमध्ये पोहोचवण्याचे काम करणार आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे परीक्षा केंद्रावर सॅनिटायझर ठेवण्याच्या सूचना बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत. याशिवाय मास्कचा वापर हाेणार असून शारीरिक अंतर पाळण्यात येणार आहे. एका बाकावर एक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. एका खाेलीत २५ विद्यार्थी पेपर साेडविणार आहेत.
परीक्षा केंद्राच्या ठिकाणी वीज, पाणी, स्वच्छतागृह आदी साेयी-सुविधा असणे गरजेचे आहे. या सर्व साेयी-सुविधा शाळेत असल्याबाबतचे हमीपत्र संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य व केंद्रसंचालकांनी नागपूर बाेर्डाच्या विभागीय सचिवांच्या नावे ऑनलाइन स्वरुपात पाठविले आहे. सदर भाैतिक सुविधा असल्याबाबतच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठकीत सर्व केंद्रसंचालकांना दिल्या हाेत्या.
सहा भरारी पथकांची राहणार नजर
सदर बारावीची परीक्षा काॅपीमुक्त व निकाेप वातावरणात पार पाडण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. पी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नियाेजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, डायट तसेच महिला भरारी पथकाचा समावेश आहे.