१३४ विद्यार्थी शोधले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2017 01:14 AM2017-01-04T01:14:07+5:302017-01-04T01:14:07+5:30
राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण
जिल्हाभरात शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहीम
गडचिरोली : राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कार्यरत जि.प. शिक्षकांनी २८ ते ३० डिसेंबर २०१६ या तीन दिवसाच्या कालावधीत शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली. यामध्ये एकूण १३४ शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आले. या सर्व विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळांमध्ये दाखल करण्यात आले.
६ ते १४ वर्ष वयोगटातील एकही मूल शाळाबाह्य राहू नये, यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने विशेष धोरण आखले आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला निर्देश देण्यात आले. त्यानुसार जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने बाराही तालुकास्तरावर सूचना देऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबविली. गडचिरोली तालुक्यात ८, आरमोरी तालुक्यात १४, देसाईगंज तालुक्यात ९, कुरखेडा तालुक्यात १८, कोरची तालुक्यात १०, धानोरा तालुक्यात १०, चामोर्शी तालुक्यात ५, मुलचेरा तालुक्यात ७, अहेरी तालुक्यात ११, एटापल्ली तालुक्यात ५, भामरागड तालुक्यात १९ व सिरोंचा तालुक्यात १८ असे एकूण १३४ विद्यार्थी शाळाबाह्य आढळून आलेत.
या विद्यार्थ्यांना गावाच्या व शहराच्या परिसरातून शोधून काढण्यात आले. या शोध मोहिमेसाठी जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांच्यासह बाराही तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक व कार्यरत शिक्षकांनी सहकार्य केले. शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिमेदरम्यान सर्व शिक्षकांना गाव शैक्षणिक पंजीका उपलब्ध करून देण्यात आले. या पंजीकेतील मुद्याच्या अनुषंगाने शिक्षकांनी गावात व शहरात फिरून शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम राबविली. ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलामुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार घेत असते. या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यस्तरावरून विविध कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची पटावरील संख्या कायम राहावी, यासाठी शालेय पोषण आहार, गणवेश वितरण, पुस्तके व शैक्षणिक साहित्य पुरविणे, विविध स्पर्धांचे आयोजन व इतर उपक्रम राबविले जात आहेत. आता शिक्षक व विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने बायोमेट्रीक व सेल्फीचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेत मुलींचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
१४ मुलांनी शाळाच पाहिली नाही
६ ते १४ वर्ष वयोगटातील शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम जिल्ह्यात राबविण्यात आली. यामध्ये मुळीच शाळेत न गेलेले १४ शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आले. यामध्ये आरमोरी तालुक्यात ७, कुरखेडा तालुक्यात १, कोरची तालुक्यात ४, चामोर्शी १, अहेरी १ व अहेरी १ असे एकूण १४ मुलां, मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या १४ विद्यार्थ्यांनी यापूर्वी कधीही शाळा पाहिली नाही व ते शाळेतही गेले नाही. मध्येच शाळा सोडलेले १२० शाळाबाह्य विद्यार्थी शोधून काढण्यात आले व त्यांना नजीकच्या शाळेत दाखल करण्यात आले.