१३८ हातपंपाची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:27 AM2018-04-18T00:27:58+5:302018-04-18T00:27:58+5:30
भूजल पातळी खोलात जात असल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून हातपंपासाठी मागणी होत आहे. २०१७-१८ या वर्षात सुमारे १३८ हातपंप मंजूर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भूजल पातळी खोलात जात असल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून हातपंपासाठी मागणी होत आहे. २०१७-१८ या वर्षात सुमारे १३८ हातपंप मंजूर करण्यात आले. त्यापैकी ७१ हातपंप खोदून पूर्ण झाले आहेत. तर ६७ हातपंप खोदण्याचे काम सुरू झाले आहे. हातपंपांमध्ये भर पडल्याने पाणी टंचाईचे सावट कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागातील पाण्याची गरज विहीर व हातपंपांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. विहिरीसाठी अधिक निधी व जागा लागते. विहीर खोदण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक विहिरीपेक्षा हातपंप खोदण्यावर अधिक भर देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच हातपंपांची मागणी वाढत चालली आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी शासन सुध्दा विविध योजनांंतर्गत हातपंप खोदून देत आहे.
२०१७-१८ या वर्षात विविध योजनांतर्गत १३८ हातपंप खोदण्यात आले आहेत. १३ वने अंतर्गत ५७ हातपंप, खासदार निधीतून ११ हातपंप, आरमोरी विधानसभा क्षेत्रातील दोन हातपंप व अहेरी विधानसभा क्षेत्रात एक हातपंप असे एकूण ७१ हातपंपांचे खोदकाम पूर्ण झाले असून सदर हातपंप सुरू सुध्दा झाले आहेत. त्याचबरोबर आरमोरी विधानसभा क्षेत्रात ३५ नवीन हातपंप व अहेरी विधानसभा क्षेत्रात ३२ नवीन हातपंप मंजूर करण्यात आले आहेत. सदर हातपंप खोदण्याचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती यांत्रिकी उपविभागाचे उपअभियंता यांनी दिली.
करारनामे न झाल्याने यांत्रिकी विभाग अडचणीत
हातपंप दुरूस्त करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर यांत्रिकी उपविभाग स्थापन करण्यात आला आहे. या उपविभागाचे प्रत्येक पंचायत समितीमध्ये हातपंप दुरूस्ती वाहन व कर्मचारी आहेत. हातपंप दुरूस्त करण्यासाठी संबंधित हातपंपाचा यांत्रिकी विभागासोबत करारनामा होणे आवश्यक आहे. करारनामा झाल्यानंतर ग्रामपंचायत एक विशिष्ट रक्कम यांत्रिकी विभागाला उपलब्ध करून देते. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ९ हजार ८३२ हातपंपांपैकी सुमारे २ हजार ५१ हातपंपांचे करारनामे झाले नाहीत. त्यामुळे यांत्रिकी विभागाला मिळणारा महसूल कमी झाला आहे. करारनामा झाला नसला तरी पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन सदर हातपंप दुरूस्त केला जातो. यामुळे यांत्रिकी विभागाचा तोटा आहे. सर्वच हातपंपांचे करारनामे करणे सक्तीचे करावी, अशी मागणी होत आहे. मात्र याकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
८८ हातपंप आढळले बंद
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ९ हजार ८३५ हातपंप आहेत. त्यापैकी ७ हजार ७८४ हातपंपांचा पंचायत समितीमार्फत दुरूस्तीचा करारनामा झाला आहे. चालू आठवड्यात यातील ८८ हातपंप बंदस्थितीत असल्याचे आढळून आले आहे. मागील आठवड्यात १४८ हातपंप बंद पडले होते. सदर हातपंप दुरूस्त करण्यात आले आहेत. एकूण हातपंपापैकी ९ हजार ४४५ हातपंप सुरू आहेत.