चामोर्शीतील १४ घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 01:45 AM2017-07-23T01:45:13+5:302017-07-23T01:45:13+5:30
मंगळवारी व बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने चामोर्शी शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले.
६५ हजारांचे नुकसान : महसूल विभागामार्फत पंचनामा
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : मंगळवारी व बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने चामोर्शी शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यांच्या अन्नधान्याची नासधूस झाली. अतिवृष्टीने १४ घरांची पडझड झाल्याने अंशत: ६५ हजार रूपयांचे नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यादरम्यान दिसून आले आहे.
घरांच्या भिंती, शाळेची भिंत, संरक्षण भिंत, शौचालयाची भिंत, माती व कुडाच्या झोपड्यांची पडझड झाली आहे. लक्ष्मण वासेकर, यादव वासेकर, बाबाजी गडकर, अनिल पालकर, सुरेश सोनटक्के, दिलीप पोतराजवार, जनार्धन कागदेलवार, उसन म्हशाखेत्री यांच्या घरांची पडझड झाली आहे. जिल्हा परिषद नुतन शाळा, कल्पना डांगे, सुधाकर श्रीरामे, आशन्ना आसनवार, कारूजी चिमुरकर या नागरिकांच्या घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. मंडळ अधिकारी पुरूषोत्तम बोदलकर, तलाठी डी. एस. शेडमाके, कालिदास मांडवगडे यांनी पडझड झालेल्या घरांना प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्याचा अहवाल तहसील कार्यालय चामोर्शी येथे पाठविण्यात आला आहे.
ऐन पावसाळ्यात घर कोसळल्याने अनेक नागरिकांसमोर निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धान रोवणीची कामे सुरू असताना नागरिकांना घर दुरूस्ती करावी लागत आहे. धानाच्या शेतीसाठी गोळा करून ठेवलेला पैसा आता घर दुरूस्तीसाठी वापरावा लागणार आहे. काही नागरिकांकडे तर पैसेही नाही, अशा नागरिकांसमोर घर दुरूस्तीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा नागरिकांना महसूल विभागाच्या वतीने तातडीची मदत द्यावी, अशी मागणी आपद्ग्रस्त नागरिकांनी केली आहे. तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर जमिनीवरील धानपीक व बांधीचे पारे भुईसपाट झाले आहेत. रोजगार हमी योजनेतून पारे टाकून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.