कोरचीजवळ पकडली १४ लाखांची दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:00 AM2020-05-07T05:00:00+5:302020-05-07T05:00:30+5:30
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत सगणे व त्यांचे पथक पाळत ठेवून असताना बुधवारच्या पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास एका मालवाहू वाहनाने (सीजी ०८, एल २७६८) दारूच्या पेट्या येत असल्याचे दिसले. त्या ट्रकची झडती घेतली असता त्यात ११ प्लास्टिकच्या चुंगड्यांमध्ये प्रत्येकी १८० मिलीच्या १२५० सिलबंद निपा भरलेल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या उत्तर टोकावरील कोरची येथून १५ किमी अंतरावर असलेल्या खुर्शीपार येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने बुधवारी केलेल्या कारवाईत तब्बल १४ लाख रुपयांची देशी दारू (अवैध विक्री किंमत ५४ लाख रुपये) पकडली. यात सात आरोपींना अटक केली असून दोघे जण फरार आहेत. गेल्या अनेक दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारू जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत सगणे व त्यांचे पथक पाळत ठेवून असताना बुधवारच्या पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास एका मालवाहू वाहनाने (सीजी ०८, एल २७६८) दारूच्या पेट्या येत असल्याचे दिसले. त्या ट्रकची झडती घेतली असता त्यात ११ प्लास्टिकच्या चुंगड्यांमध्ये प्रत्येकी १८० मिलीच्या १२५० सिलबंद निपा भरलेल्या होत्या. त्या निपांवर देशी मदिरा प्लेन असे कागदी लेबल लागले होते. त्यांची प्रत्येकी किंमत ५० रुपये असून अवैध विक्री किंमत २०० रुपये आहे.
तसेच खाकी रंगाच्या ५२० सिलबंद बॉक्समध्ये १८० मिली दारूच्या २६ हजार प्लास्टिक बॉटल आढळून आल्या. त्यांची एकूण विक्री किंमत १३ लाख असून अवैध विक्री किंमत ५२ लाख रुपये आहे.
या कारवाईत दारूच्या वाहतुकीसाठी वापरलेला ट्रॅक्टर (किंमत ५.५० लाख), इंजिन (५० हजार रुपये), तीन मोबाईल (किंमत ७ हजार) असा ऐवज जप्त करण्यात आला. या कारवाईत तरूण ऊर्फ नितीन निर्मल धमगाये (२०) रा.कोरची, महेश ऊर्फ गोलू प्रकाश मुंगनकर (२४) रा.मालेवाडा ता.कोरची, प्रेमसिंग दामोदरसिंग राजपूत (४०) रा.ढोलखेडा जि.दोसा (राजस्थान), मदनसिंग सिताराम राजपूत (५४) रा.पहाडपूर जि.भरतपूर (राजस्थान), मदन गीयुराम गोटा (२५) रा.मुलेटिपदीकसा ता.कोरची, विनोद लालसाय ताडामी (२५) रा.खुर्सीपार ता.कोरची आणि विनोदकुमार शेंडे (४५) रा.कोरामटोला जि.राजनांदगाव (छत्तीसगड) अशा सात आरोपींना अटक करण्यात आली. तिलक उंदीरवाडे रा.खुर्शीपार आणि सचिन भोयर रा.देसाईगंज हे दोन आरोपी फरार आहेत.
या सर्वांवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
सीमाबंदी असताना दारू आली कशी?
स्थानिक गुन्हे शाखेचे पकडलेली ही देशी दारू मध्य प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे. देशपातळीवरील लॉकडाऊनमुळे गेल्या सव्वा महिन्यापासून राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमा वाहतुकीसाठी बंद आहेत. असे असताना दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेशातील दारू आली कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे. ही दारू आयात झाली त्यावेळी जिल्ह्याच्या आणि राज्याच्या सीमेवर ड्युटी करणारे पोलीस पथक झोपेत होते, की त्यांनी झोपेचे सोंग घेतले होते? याचा तपास करून त्यांच्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दारू तस्करीची परंपरा सुरूच
या दारू तस्करीतील आरोपी तरुण उर्फ नितीन धमगाये (२०) हा कुख्यात दारू तस्कर निर्मल धमगाये याचा मुलगा आहे. निर्मलवर दारू तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. पण त्याचा हा व्यवसाय आता त्याचा मुलगा सांभाळत असल्याने दारू तस्करीची परंपरा त्याच्या कुटुंबात आणि कोरची परिसरात कायम असल्याचे दिसून येते.