१४ रस्त्यांच्या कामांकडे कंत्राटदारांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:08 PM2019-03-13T23:08:31+5:302019-03-13T23:08:54+5:30
जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागातील रस्त्यांची समस्या मिटविण्यासाठी संबंधित यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करीत असली तरी अलिकडे वाढलेल्या नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे त्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात आहे. वारंवार निविदा काढूनही ६१ कोटी रुपये किमतीच्या १४ कामांसाठी कोणीच कंत्राटदार निविदा भरण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळे आता सुरू आहे ती कामे पूर्णत्वास नेण्याकडे यंत्रणेचा कल वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागातील रस्त्यांची समस्या मिटविण्यासाठी संबंधित यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करीत असली तरी अलिकडे वाढलेल्या नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे त्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात आहे. वारंवार निविदा काढूनही ६१ कोटी रुपये किमतीच्या १४ कामांसाठी कोणीच कंत्राटदार निविदा भरण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळे आता सुरू आहे ती कामे पूर्णत्वास नेण्याकडे यंत्रणेचा कल वाढला आहे.
दुर्गम भागातील गावांना जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अनेक रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परंतू गेल्या ६ महिन्यात रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांच्या वाहनांची जाळपोळ करण्याच्या घटना वाढल्या आहेत. यात काही कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे दुर्गम भागातील रस्त्यांची कामे करण्यासाठी कोणी कंत्राटदार पुढे येत नसल्याचे दिसून येते. यातूनच अनेक कामे अर्धवट स्थितीत येऊन पडली आहेत. ती कामे पूर्णत्वास नेल्याशिवाय नवीन कामांच्या निविदाच काढायच्या नाहीत, असे आता या यंत्रणेने ठरविले आहे. निवडणुकीच्या काळात नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आता नवीन कामे हाती घेण्याऐवजी जुनीच कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सध्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून २००७-०८ मधील ८६ किलोमीटर लांबीची १७ जुनी कामे चालू आहेत. २ जुनी कामे निविदा प्रक्रियेत आहेत तर ३१ किलोमीटरच्या ५ कामांसाठी नव्याने प्रशासकीय मान्यता घेतली जाणार आहे. नवीन कामांपैैकी २०५ किलोमीटर लांबीची ५६ कामे चालू आहेत. २२ कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे मुख्य रस्त्यावरील असल्याने ती करण्यात फारशी अडचण जात नाही. परंतू प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे दुर्गम भागातील असल्यामुळे अनेक आव्हानांना तोंड देत ती पूर्ण करणे कठीण झाल्याची व्यथा अधिकारी सांगतात.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २३ कामांच्या निविदांना प्रतिसाद मिळाला. त्यापैैकी १४ च्या वर्क आॅर्डर झाल्या आहेत.
वर्षभरात ६ वेळा निविदा
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १२ रस्त्यांच्या कामांसाठी या विभागाने गेल्या वर्षभरात तब्बल ६ वेळा निविदा मागविल्या. ५५ कोटी ३९ लाखांच्या या कामासाठी कोणीही कंत्राटदार निविदा भरण्यास पुढे आलेले नाही. या कामांमध्ये १० कामे भामरागड तालुक्यातील आहेत. एक काम अहेरी तर दुसरे धानोरा तालुक्यातील आहे. याशिवाय २००७-०८ मध्ये मंजूर असलेल्या भामरागड तालुक्यातील ६ कोटी ७९ लाखांच्या दोन कामांसाठी तब्बल १८ वेळा निविदा काढण्यात आल्या. परंतू ती कामे करण्यासाठीही कोणी कंत्राटदार पुढे आलेले नाही.