१४ वाहनचालकांकडून दंड वसूल
By admin | Published: June 3, 2016 01:14 AM2016-06-03T01:14:59+5:302016-06-03T01:14:59+5:30
स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने अवैधरित्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम ३१ मे पासून हाती घेण्यात आली.
आरटीओंची कारवाई : ७ जूनपर्यंत राहणार मोहीम
गडचिरोली : स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने अवैधरित्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम ३१ मे पासून हाती घेण्यात आली. आतापर्यंत आरटीओच्या पथकाने या मोहिमेअंतर्गत अवैधरित्या प्रवाशी वाहतूक करणारे १४ वाहनांना पकडले. यापैकी ४ वाहनचालकांनी ९ हजार ४०० रूपयांचे दंड भरून स्वत:चे वाहन सोडविले. अद्यापही ८ वाहन आरटीओच्या ताब्यात आहेत.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत शासनाच्या आदेशानुसार ३१ मे ते ७ जून या १ आठवड्याच्या कालावधीत अवैधरित्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. बुधवारी चंद्रपूर मार्गावर ३० ते ३५ वाहनांची तपासणी करण्यात आली. यात १४ वाहनधारकांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याचे लक्षात आले. या वाहनधारकांना नोटीस बजावून त्यांचे वाहन जप्त करण्यात आले. यापैकी चार वाहनधारकांनी ९ हजार ४०० रूपयांचा दंड अदा केला आहे. आरटीओच्या या मोहिमेमुळे वाहनधारक धास्तावले आहेत. परिवहन विभागाच्या वतीने जिल्हाभरात मे महिन्याच्या कालावधीत कारवाई करून वाहनधारकांकडून १० लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.