एसटीचे 14 कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 05:00 AM2021-11-10T05:00:00+5:302021-11-10T05:00:30+5:30
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबरपासून कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. अकराव्या दिवशीही आंदाेलन सुरूच आहे. सर्वच चालक व वाहक संपावर असल्याने एसटीची सेवा ३० ऑक्टाेबरपासूनच ठप्प पडली आहे. संप मागे घेण्याबाबत अनेक वेळा आवाहन करण्यात आले. मात्र, कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम असून, जाेपर्यंत विलीनीकरणाची मागणी पूर्ण हाेत नाही, ताेपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : बेकायदेशीर संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून गडचिराेली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांतील १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कारवाईमुळे काेणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी बसस्थानक परिसरात पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबरपासून कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. अकराव्या दिवशीही आंदाेलन सुरूच आहे. सर्वच चालक व वाहक संपावर असल्याने एसटीची सेवा ३० ऑक्टाेबरपासूनच ठप्प पडली आहे. संप मागे घेण्याबाबत अनेक वेळा आवाहन करण्यात आले. मात्र, कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम असून, जाेपर्यंत विलीनीकरणाची मागणी पूर्ण हाेत नाही, ताेपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
संपकरी कर्मचाऱ्यांवर पहिली कारवाई करताना संपात सहभागी १४ कर्मचाऱ्यांना विभागीय वाहतूक अधीक्षकांनी निलंबित केले आहे. यामध्ये गडचिराेली आगारातील तीन, अहेरी सहा व ब्रह्मपुरी आगारातील पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरची ही पहिली कारवाई आहे. संप पुढेही चालू राहिल्यास आणखी काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड काेसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. गडचिराेली विभागासह राज्यातील इतर विभागांमध्येही संपकर्त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मागील ११ दिवसांपासून संप सुरू असल्याने एसटीचे माेठे नुकसान हाेत आहे. ऐन दिवाळीच्या कालावधीत संप पुकारल्याने या कालावधीत मिळणाऱ्या उत्पन्नापासून एसटीला वंचित राहावे लागले आहे. संपामुळे एसटीची आर्थिक स्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे.
अनुचित घटना टाळण्यासाठी पाेलीस बंदाेबस्त
निलंबनाची कारवाई केल्यानंतर काेणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी एसटी विभागाने पाेलीस बंदाेबस्त मागविला हाेता. दिवसभर बसस्थानक परिसरात पाेलिसांचा पहारा हाेता. मात्र, निलंबनाची यादी बसस्थानकावर चिकटविल्यानंतरही संप शांततेत सुरू हाेता. काेणतीही अनुचित घटना घडली नाही.
बडतर्फ केले तरी संप सुरूच राहणार
संपात सहभागी झाल्यानंतर निलंबनाची कारवाई केली जाणार, याची खात्री पूर्वीच हाेती. मात्र, या कारवाईला न घाबरता संप सुरू ठेवला आहे. निलंबनच नाही तर सेवेतून बडतर्फ केले तरी आंदाेलन मागे घेतले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया आंदाेलक कर्मचाऱ्यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली आहे.