आयटीआयच्या अडीच हजार जागांसाठी 14 हजार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 05:00 AM2021-08-25T05:00:00+5:302021-08-25T05:00:48+5:30
गेल्या दाेन वर्षांपासून काेराेना संकट आवासून उभे आहे. गतवर्षी काेराेनामुळे विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करणे शक्य झाले नाही. मात्र, यावर्षी काेराेनाचे संकट आटाेक्यात आले आहे. यावर्षी नव्याने दहावी उत्तीर्ण झालेले व गतवर्षी दहावी उत्तीर्ण झालेले, मात्र अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांनी यावर्षी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. यावर्षी जिल्ह्यात विद्यार्थ्यांकडून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दिलीप दहेलकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध ट्रेड अर्थात अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० ऑगस्ट २०२१ आहे. गडचिराेली जिल्ह्यात सर्व संस्था मिळून एकूण २ हजार ५२० जागा आहेत. या जागांसाठी आतापर्यंत जिल्हाभरातून १४ हजार ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. जागा कमी व अर्ज अधिक असल्याने यंदा आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच स्पर्धा हाेणार आहे.
व्यावसायिक प्रशिक्षण आणि शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्याकरिता १५ जुलैपासून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यावर्षी इयत्ता दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आला. यावर्षी इयत्ता दहावीचा निकाल फुगल्यामुळे आयटीआय प्रवेशाला अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. गतवर्षी काेराेना संकटामुळे आयटीआय प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळाला हाेता.
सप्टेंबरपासून सुरू हाेणार प्रवेशफेऱ्या
३० ऑगस्ट २०२१ पर्यंत प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या एकूण अर्जाची संख्या व प्रवेश प्रक्रियेचे नियाेजन संचालनालयाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात गुणवत्तेनुसार प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी यादी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी आपल्या इच्छेनुसार ट्रेडची निवड करून प्रवेश घेणार आहेत. यावर्षी प्रवेश प्रक्रियेला थाेडासा विलंब हाेत असल्याचे दिसून येत आहे.
यंदा चांगला प्रतिसाद
- गेल्या दाेन वर्षांपासून काेराेना संकट आवासून उभे आहे. गतवर्षी काेराेनामुळे विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करणे शक्य झाले नाही. मात्र, यावर्षी काेराेनाचे संकट आटाेक्यात आले आहे. यावर्षी नव्याने दहावी उत्तीर्ण झालेले व गतवर्षी दहावी उत्तीर्ण झालेले, मात्र अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांनी यावर्षी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. यावर्षी जिल्ह्यात विद्यार्थ्यांकडून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
काैशल्य प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय उभारून आर्थिकदृष्टया स्वावलंबी हाेण्याच्या उद्देशाने मी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर केला आहे. गुणवत्ता यादी व प्रवेश फेरीची प्रतीक्षा करीत आहे.
- विशाल हिचामी
आधी आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करायचा, त्यानंतर तंत्रनिकेतनचे शिक्षण घेण्याचे माझे नियाेजन आहे. त्यासाठी मी आयटीआय प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज दाखल केला आहे.
- प्रशांत रामटेके