१५ जनावरांना जीवदान
By admin | Published: October 5, 2016 02:17 AM2016-10-05T02:17:53+5:302016-10-05T02:17:53+5:30
सिरोंचामार्गे तेलंगणा राज्यात ट्रकमध्ये कोंबून नेण्यात येत असलेले ट्रक ताब्यात घेऊन १४ गायी व एका बैलाला सोडविले.
सिरोंचातील घटना : हिंदुत्ववादी संघटनांची कारवाई
सिरोंचा : सिरोंचामार्गे तेलंगणा राज्यात ट्रकमध्ये कोंबून नेण्यात येत असलेले ट्रक ताब्यात घेऊन १४ गायी व एका बैलाला सोडविले. सदर घटना सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
गोदावरी नदीवर पूल झाला. तेव्हापासून एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील गायी, म्हशी, बैल खरेदी करून सदर जनावरे वाहनामध्ये कोंबून ती तेलंगणामध्ये नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सिरोंचामार्गे गायी व बैलांची तस्करी होत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार सिरोंचा तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून सिरोंचाजवळ ट्रक अडविला. ट्रकमध्ये १४ गायी, एक बैल असल्याचे दिसून आले. सर्व जनावरांना व्यवस्थित ट्रकखाली उतरवून त्यांना सिरोंचा येथील कोंडवाड्यात टाकले. ट्रक चालकाची विचारपूस करीत असतानाच ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. बजरंग दलाचे कार्यकर्ते शंकर नरहरी यांनी भारतीय जनता पार्टीचे तालुका शहर अध्यक्ष संदीप राचेर्लावार यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर राचेर्लावार, रवी चकिनारपू, दिलीप शेनिगरापू, सल्लार सय्यद, सतीश गाटू यांनी घटनास्थळ गाठले. काही वेळानंतर सिरोंचाचे पोलीस निरीक्षक नागेश कदम, पशुधन विकास अधिकारी डॉ. चव्हाण हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. जनावरांना सुरक्षित बाहेर काढण्यात रमेश गट्टू, चंदू बातुल्ला, संपत तनगुला, रवी बोनंगोनी, गंगाधर कंबगोनी, अशोक मारशेट्टी, शंकर नरहरी, राजेश तनगुला, श्याम बेजन्नी, सुरेश पदीगेला, समय्या ओलाल्ला, मदनया मदेशी, सदाशिव कंबगोनी यांनी पार पाडली. या सर्व जनावरांना गोशाळेत पाठविले जाणार आहे. याबाबतची तक्रार सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आल्यानंतर वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक केले आहे. यानंतरही या मार्गावर पाळत ठेवून जनावरांची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा संकल्प करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
पुलामुळे जनावरांची तस्करी वाढली
गोदावरी नदीवरचा पूल बांधून पूर्ण झाला असून या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे जनावर तस्करांसाठी रान मोकळे झाले आहे. एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. येथील पशुधन खरेदी करून सदर पशुधन तेलंगणा राज्यात वाहनाच्या सहाय्याने नेण्याचे प्रकार मागील महिन्यापासून वाढले आहेत. तेलंगणा राज्यात अजूनपर्यंत पूर्ण रस्ते झाले नाही. रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जनावरांची तस्करी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याकडे सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा जनावरे तस्करीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.