गडचिरोलीसाठी १५ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:57 PM2018-10-15T22:57:09+5:302018-10-15T22:57:28+5:30

नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत वैशिष्ट्यपूर्ण कामांची यादी ठेवून त्यावर चर्चा करण्यात आली. सर्व संमतीने शहरातील विकास कामे मंजूर करण्यात आल्यानंतर सदर कामासाठीचा प्रस्ताव यादीसह राज्याच्या नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला.

15 crores sanctioned for Gadchiroli | गडचिरोलीसाठी १५ कोटींचा निधी मंजूर

गडचिरोलीसाठी १५ कोटींचा निधी मंजूर

googlenewsNext
ठळक मुद्देअवर सचिवांचे आदेश धडकले : नगर पालिकेच्या पुढाकाराने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरात होणार ३५ वर कामे

दिलीप दहेलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत वैशिष्ट्यपूर्ण कामांची यादी ठेवून त्यावर चर्चा करण्यात आली. सर्व संमतीने शहरातील विकास कामे मंजूर करण्यात आल्यानंतर सदर कामासाठीचा प्रस्ताव यादीसह राज्याच्या नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर नगर विकास विभागाने सन २०१८-१९ या वर्षात गडचिरोली शहरातील ३५ वर कामांसाठी निधी मंजूर करण्यास तत्त्वत: मान्यता प्रदान केली आहे. या संदर्भातील राज्य शासनाच्या अवर सचिवांचे आदेश जिल्हा व नगर परिषद प्रशासनाला धडकले आहे.
राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतींना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान देण्यात येते. त्यानुसार गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने ठराव मंजूर करून यादीत नमूद केलेल्या कामांसाठीच्या प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यात आली. या कामांसाठी नगर परिषदेला जवळपास १५ कोटींचा निधी मंजूर करण्यास तत्त्वत: मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नगर परिषदेने प्रस्तावात नमूद केलेली सदर कामे मागील पाच वर्षात झाली नाहीत अथवा पाणीपुरवठा व मलनित्सार प्रकल्पामुळे नव्याने घेण्यात येणारी कामे बाधित होणार नाही, याची खातरजमा करावी, असे अवर सचिवांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
नगर पालिकेने निश्चित केलेल्या कामांना मान्यता देऊन तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्रदान करून प्रशासकीय मान्यता व निधी वितरणासाठी याबाबतचा प्रस्ताव शासनास जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा, असे आदेशात राज्यशासनाने म्हटले आहे. याबाबतचे नगर विकास विभागाच्या अवर सचिवांचे आदेश २९ आॅक्टोबर २०१८ रोजी पत्रान्वये प्राप्त झाले आहे.
४ जून २०१८ रोजी नगर पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत शहरातील रस्ते, नाली व इतर विकास कामांना मंजुरी देऊन ठराव घेण्यात आले. त्यानंतर बांधकाम विभागाच्या वतीने कामांची अंदाजे किंमत ठरवून याबाबतचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाचा विचार करून शासनाने आता जवळपास १५ कोटींच्या निधी मंजुरीस तत्त्वता मान्यता प्रदान केली आहे.

गडचिरोली शहरात होणार ही कामे
विसापूर टोली ते वैनगंगा नदीघाटापर्यंत पांदण रस्त्याचे मातीकाम, लांझेडा-खरपुंडी ते कठाणी नदीपर्यंत पांदण रस्ता, बलकीदेव ते एसटीपीकडे जाणारा पांदण रस्ता, रामनगर पोटेगाव बायपास रोड ते राममंदिर ते नेताजी सुभाष चौक पासून हनुमान मंदिर ते ताकसांडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व बंदीस्त नालीचे काम, सोनापूर प्रभाग क्र. ११ मध्ये रोड खडीकरण व नाली बांधकाम, गोकुलनगर प्रभाग क्र.७ मध्ये शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय ते पाणी टाकीला जोडणाºया रस्त्याचे डांबरीकरण, स्नेहनगरात मोकळी जागा विकसित करणे, कॅम्प एरिया प्रभाग क्र.६ मध्ये ओपन स्पेस विकसित करणे, सोनापूर वॉर्डात खडीकरण व नाली बांधकाम, लांझेडा प्रभाग क्र.२ मध्ये सिमेंट व नाली बांधकाम, प्रभाग क्र.९ मध्ये हनुमान मंदिर ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सिमेंट रोड बांधकाम आदीसह जवळपास ३७ कामांचा समावेश आहे.

वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदानातून नगर विकास विभागाच्या वतीने शहरातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी जवळपास १५ कोटींचा निधीस मान्यता देण्यात आली आहे. ठराव घेऊन प्रस्तावित नमूद केलेल्या कामांची तांत्रिक मान्यता घेण्याची कार्यवाही पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राप्त निधीतून शहरात ही सर्व विकास कामे सुरू करण्यात येणार आहे. सदर निधी लवकर मिळावा, यासाठी आपला शासनाकडे प्रयत्न आहे.
- योगीता प्रमोद पिपरे,
नगराध्यक्ष, गडचिरोली

Web Title: 15 crores sanctioned for Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.