१५ दिवसांत अहेरीत अग्निशमन वाहन दाखल होणार
By admin | Published: May 29, 2017 02:23 AM2017-05-29T02:23:51+5:302017-05-29T02:23:51+5:30
जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी उपविभागात सिरोंचा व अहेरी या दोन नगर पंचायतींना
आगीच्या घटनांवर येणार नियंत्रण : डीपीडीसीच्या ७५ लाख रूपयांतून अग्निशमन वाहन केले होते मंजूर
विवेक बेझलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी उपविभागात सिरोंचा व अहेरी या दोन नगर पंचायतींना अग्नीशमन वाहन जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून मंजूर केले. सदर वाहन तयार करण्याचा अवधी १३ जूनला संपणार आहे. येत्या १५ दिवसांत अहेरी शहरात नगर पंचायत प्रशासनाकडे तब्बल ७५ लाख रूपयांचे अग्नीशमन वाहन दाखल होणार आहे.
पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या नेतृत्वात सन २०१५-१६ मध्ये झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत अहेरी उपविभागातील सिरोंचा व अहेरी या दोन नगर पंचायतीला अग्नीशमन वाहनांसाठी प्रत्येकी ७५ लाख रूपये देण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेच्या अधिन राहून सन २०१५-१६ च्या डिसेंबरअखेर अग्नीशमन वाहनासाठी ई-टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. सदर वाहन खरेदीसाठी फेब्रुवारी २०१७ ला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ई-टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सदर अग्नीशमन वाहन बनविण्याची जबाबदारी पुणे येथील हायटेक सर्व्हिसेसला देण्यात आली. या संदर्भात १४ मार्च २०१७ रोजी कार्यारंभ आदेश घेऊन अग्नीशमन वाहन बांधणीसाठी परवानगी देण्यात आली. कार्य आदेशानुसार तीन महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण करावयाचे होते. दरम्यान २८ मार्च २०१७ ला अहेरीचे मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके हे पुण्याला गेले. त्यांनी अग्नीशमन वाहनाचे चेसीस्ट निरिक्षण व डिझाईन मान्यतेसाठी चालू कामाचा आढावा सुध्दा घेतला. कार्य आदेशानुसार येत्या १३ जूनला अग्नीशमन वाहन तयार करून देण्याचा कालावधी संपत आहे. त्यामुळे १५ ते १७ दिवसांत अहेरी नगर पंचायतीला हे अग्नीशमन वाहन मिळणार आहे. अहेरी परिसरात आजवर झालेल्या आगीच्या घटनेत अनेक घरे, दुकाने व गोदाम जळून खाक झाली. गडचिरोली व चंद्रपूर येथून अग्नीशमन वाहन घटनेच्या वेळी पाचारण करावे लागत होते. आता अग्नीशमन वाहन उपलब्ध होणार आहे