१५ विमा प्रकरणे मंजूर

By admin | Published: March 20, 2017 01:21 AM2017-03-20T01:21:03+5:302017-03-20T01:21:03+5:30

राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून

15 insurance cases approved | १५ विमा प्रकरणे मंजूर

१५ विमा प्रकरणे मंजूर

Next

१२ प्रकरणांमध्ये आढळल्या त्रुट्या : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
दिलीप दहेलकर   गडचिरोली
राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून सन २०१५-१६ मध्ये एकूण ५१ अर्ज प्राप्त झाले. यापैकी १५ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. तर १२ प्रकरणे त्रुट्यांमुळे प्रलंबित आहेत.
भाजप प्रणित राज्य सरकारने शेतकरी हिताचे धोरण स्वीकारले असून शेतकरी कुटुंबीयांसाठी अनेक नाविण्यपूर्ण कल्याणकारी योजना आखल्या आहेत. शेतकऱ्याचा अपघात होऊन जखमी वा मृत पावल्यास संबंधित लाभार्थ्यास नुकसान भरपाई म्हणून रोख रूपये देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या नावाने शासनाची ही योजना असून अपघाताच्या प्रकारानुसार संबंधित लाभार्थ्यास शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येते. संकटाच्या वेळी शेतकरी कुटुंबाला आधार मिळावा या हेतुने राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गडचिरोली जिल्ह्यात केली जात आहे. सदर योजनेच्या लाभासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात येते.
१ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१६ या कालावधीत अपघात होऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे एकूण ५१ प्रस्ताव या योजनेंतर्गत नुकसान भरपाईच्या लाभासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची कृषी अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. त्यानंतर १५ प्रकरणे मंजूर करण्यात आले. तर तीन प्रकरणे नामंजूर करण्यात आले. अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रस्तावांमध्ये अनेक त्रुट्या आढळून आलेले १२ प्रकरणे संबंधित शेतकरी कुटुुंबांकडे प्रलंबित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. संबंधित शेतकरी कुटुंब या प्रस्तावांमध्ये त्रुट्यांची पूर्तता करून कृषी कार्यालयाला हे प्रस्ताव नव्याने सादर करतील. त्यानंतर सदर प्रस्तावाची पडताळणी करून ते मंजूर करण्यात येणार आहे.
५१ पैकी उर्वरित २० प्रस्ताव संबंधित विमा कंपनीकडे मंजुरीस्तव प्रलंबित आहे. या प्रस्तावासंदर्भात कृषी विभागाकडून संबंधित विमा कंपनीकडे संपर्क केला जात आहे. उर्वरित प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
आता राज्य शासनाच्या कृषी विभागाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची मुदत १ डिसेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१७ अशी ठेवली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन आहे व तशी संबंधित शेतकऱ्यांकडे संपूर्ण कागदपत्रे आहेत. अशा १० ते ७५ वयोगटातील शेतकऱ्याला या योजनेचा लाभ चालू आर्थिक वर्षात मिळणार आहे. या योजनेमुळे अपघातग्रस्त शेतकऱ्याला दिलासा मिळतो.

विम्यापासून असा मिळतो लाभ
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत संबंधित शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांना नुकसान भरपाई म्हणून दोन लाख रूपयाचा लाभ दिला जातो. अपघातामुळे दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रूपये, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रूपयाचा लाभ दिला जातो. अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास संबंधित लाभार्थ्यास एक लाख रूपये नुकसान भरपाई या योजनेंतर्गत दिली जाते.

विमा संरक्षणासाठी समाविष्ट अपघात
रस्ता/रेल्वे अपघात मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, सर्पदंश, विंचू दंश, खुन, उंचावरून पडून मृत्यू, नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे अथवा चाव्यामुळे होणारे अपघाती मृत्यू तसेच इतर अपघाती घटनांमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळते.

 

Web Title: 15 insurance cases approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.