१५० बेराेजगार युवतींना मिळाला राेजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:08 AM2021-02-06T05:08:29+5:302021-02-06T05:08:29+5:30
गडचिराेली : जिल्हा पाेलीस दलाच्या वतीने १५० बेराेजगार युवतींना पार्कसन्स स्किल इन्स्टिट्यूट नागपूर यांच्या सहकार्याने नर्सिंग असिस्टंटचे प्रशिक्षण देऊन ...
गडचिराेली : जिल्हा पाेलीस दलाच्या वतीने १५० बेराेजगार युवतींना पार्कसन्स स्किल इन्स्टिट्यूट नागपूर यांच्या सहकार्याने नर्सिंग असिस्टंटचे प्रशिक्षण देऊन राेजगार उपलब्ध करून देण्यात आला. या राेजगाराचे नियुक्तीपत्र पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
जिल्हा पाेलीस दलाच्या वतीने बेराेजगार युवक-युवतींकरिता राेजगार मेळावा ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून गरजू गरीब युवक-युवतींना राेजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. पाेलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाेलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या पाेलीस स्टेशन, उपपाेलीस स्टेशन, पाेलीस मदत केंद्र हद्दीतील १५० बेराेजगार युवतींना नर्सिंग असिस्टंटचे प्रशिक्षण दिले. आतापर्यंत १ हजार ६० युवतींना नर्सिंग असिस्टंट म्हणून राेजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. २६३ युवकांना तेलंगणा व हैदराबाद येथे सुरक्षारक्षक म्हणून व २३ युवकांना हाॅस्पिटॅलिटी प्रशिक्षण देऊन राेजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
१ फेब्रुवारीला पाेलीस मुख्यालयातील एकलव्य हाॅलमध्ये राेजगार प्राप्त १५० युवतींचा सत्कार समारंभ व नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी अप्पर पाेलीस अधीक्षक समीर शेख, पार्कसन्स स्किल इन्स्टिट्यूटचे केंद्रप्रमुख नितीन ठाकरे, केंद्र समन्वयक याेगेश रासेकर, प्रशिक्षक स्नेहा मेश्राम, सल्लागार संगीता रहाटे उपस्थित हाेते. यशस्वितेसाठी नागरिक कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार तसेच पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बाॅक्स ....
अतिदुर्गम भागातील युवांना संधी
गडचिराेली जिल्हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आहे. दुर्गम भागातील युवक-युवतींना शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागताे. शिक्षण घेतल्यानंतरही नाेकरीच्या संधी उपलब्ध हाेत नाहीत. त्यामुळे शिक्षण घेऊनही पुन्हा पारंपरिक व्यवसाय करावा लागताे. परंतु आता पाेलीस विभागाच्या वतीने प्रशिक्षणासह राेजगार मेळावे आयाेजित केले जात असल्याने अतिदुर्गम भागातील युवांना राेजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.