१५८ मामा तलावांच्या दुरूस्तीचे नियोजन बिघडले
By admin | Published: June 22, 2017 01:30 AM2017-06-22T01:30:51+5:302017-06-22T01:30:51+5:30
सिंचनासह विविध कामांसाठी पाण्याचा वापर करता यावा म्हणून जिल्ह्यातील १५८ माजी मालगुजारी
१५ कोटींची कामे अर्धवट : ३० जूनपूर्वी पूर्ण करावी लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिंचनासह विविध कामांसाठी पाण्याचा वापर करता यावा म्हणून जिल्ह्यातील १५८ माजी मालगुजारी (मामा) तलावांच्या दुरूस्तीचे काम गेल्या आर्थिक वर्षात (२०१६-१७) हाती घेण्यात आले. पण दुसरे आर्थिक वर्ष सुरू होऊन तीन महिने पूर्ण होत असताना हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे मामा तलावांच्या दुरूस्तीचे नियोजन बिघडल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडून मामा तलावांमधील गाळ काढून त्यांच्या दुरूस्तीसाठी वर्ष २०१६-१७ मध्ये १५.१५ कोटी रुपयांची तरतूद प्राप्त झाली होती. त्यातून जिल्हाभरातील १५८ मामा तलावांचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी निविदा काढून कार्यारंभ आदेशही देण्यात आला. पण निर्धारित वेळेत ही कामे पूर्ण झाली नाही. आधी १० जूनपूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र नंतर ही मुदत वाढवून देऊन ३० जून करण्यात आली.
वास्तविक काही भागात जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाऊस आल्यामुळे त्या भागातील तलावांच्या दुरूस्तीची कामे करणे कठीण झाले आहे. तरीही ३० जूनपूर्वी कामे पूर्ण करण्याचे आव्हान संबंधित कंत्राटदारांपुढे निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत या कामात दर्जा राहील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरू असलेल्या कामांमध्ये सर्वाधिक ३२ मामा तलावांची कामे कुरखेडा तालुक्यात, २५ चामोर्शी तालुक्यात, २४ आरमोरी तालुक्यात, १६ वडसा तालुक्यात आहेत. सर्वात कमी भामरागड तालुक्यात असून तिथे फक्त १ काम घेण्यात आले आहे. गेल्या महिन्यापर्यंत या कामांवर १५.१५ कोटींपैकी फक्त ४८.३६ लाख रुपये खर्च झाले होते. यावरून कामांची गती किती संथ आहे हे स्पष्ट होते. मामा तलावांसोबत क्लस्टरची कामेही सुरू आहे. त्यात चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक ७ कामे, गडचिरोली २, धानोरा २, आरमोरी ५, वडसा ४, कुरखेडा ५, कोरची १, चामोर्शी ७, मुलचेरा १, अहेरी ३, एटापल्ली २, भामरागड १ आणि सिरोंचा तालुक्यात २ कामांचा समावेश आहे.