१५ व्या वित्त आयोग निधीच्या गैरव्यवहाराची चौकशी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:24 AM2021-07-08T04:24:43+5:302021-07-08T04:24:43+5:30
पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभा घेण्यात आली. यावेळी बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये निधी जमा असल्याचे ...
पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभा घेण्यात आली. यावेळी बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये निधी जमा असल्याचे दिसून आल्यावर त्यांनी जिल्हा परिषदेमार्फत एवढा निधी देण्यात येत असतानासुद्धा खर्च केला जात नसल्याची खंत व्यक्त केली.
यावेळी आढावा सभेला जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, बांधकाम सभापती युधिष्ठीर बिश्वास, जि. प. सदस्य रवींद्र शहा, पंचायत समिती सभापती सुवर्णा येमुलवार, उपसभापती प्रगती बंडावार, पं. स. सदस्य गुरुदास तिम्मा, बासू मुजुमदार, गटविकास अधिकारी युवराज लाकडे, बाल विकास अधिकारी विनोद हाटकर, विस्तार अधिकारी साईनाथ साळवे, गटशिक्षणाधिकारी एम. बी. कडते, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक पंचायत समिती सभागृहात आगमन होताच पंचायत समितीतर्फे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर आढावा सभेची सुरुवात अडपल्ली ग्रामपंचायतीपासून करण्यात आली. यावेळी अनेक ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकाच्या कालावधीत विविध साहित्याची खरेदी करण्यात आले असून विद्युत साहित्यावरच १० लाख रुपये खर्च केल्याचे दिसून आले. मात्र, एका गावातील गावकऱ्यांनी बल्ब वैगरे नसल्याचा आरोप करताच अध्यक्षांनी पासबुक, कॅशबुक आणि बिल दाखविण्याची मागणी केली. मात्र, पूर्वीचे आणि आताचे दोन्ही ग्रामसेवकांनी एकमेकांवर आरोप करत आवश्यक दस्तऐवज दाखवू शकले नाही. अडपल्ली ग्रामपंचायतीच्या खात्यात शौचालयाचा निधी १५ लाख रुपये पडून असल्याचे निदर्शनास आले. तीन वर्षांपासून खात्यात निधी का ? असा सवाल करून शौचालय बांधकामाच्या निधीचे धनादेश वाटप करण्याचे निर्देश दिले. यावेळी जि. प. सदस्य रवींद्र शहा यांनी प्रशासकाच्या कार्यकाळात किमान जिल्हा परिषद सदस्यांना तरी विश्वासात घेऊन काम केले नसल्याचे खंत व्यक्त केली.
--बॉक्स-
प्रशासक व ग्रामसेवकांची कानउघाडणी
प्रशासकाच्या कालावधीत १४ व १५ व्या वित्त आयोगाचा मोठा निधी खर्च करण्यात आला असून, ग्रामपंचायतीची योग्य माहिती घेताच अनेक ग्रामपंचायतीमध्ये अनियमितता आढळल्याने अध्यक्ष कंकडालवार यांनी प्रशासक आणि ग्रामसेवकांची चांगलीच कानउघाडणी करून वित्त आयोगाच्या निधीचा पर्दाफाश केला.
070721\1554-img-20210707-wa0004.jpg
मूलचेरा आढावा बैठक