नाल्यातील वीज प्रवाहाने 16 जनावरांचा मृत्यू, 33 बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 12:32 PM2019-09-08T12:32:22+5:302019-09-08T12:43:58+5:30
अहेरीपासून 12 किमी अंतरावर असलेल्या देवलमारी येथे रविवारी नाल्याच्या प्रवाहात आलेल्या विद्युत प्रवाहामुळे 16 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
अहेरी (गडचिरोली) - अहेरीपासून 12 किमी अंतरावर असलेल्या देवलमारी येथे रविवारी (8 सप्टेंबर) सकाळी नाल्याच्या प्रवाहात आलेल्या विद्युत प्रवाहामुळे 16 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जनावरं पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी देवलमरी गावातील 15 शेतकऱ्यांची एकूण 49 जनावरे जंगलात चरण्यासाठी गेली होती. काही शेतकऱ्यांनी सर्व जनावरांना जंगलातून गावाकडे नेण्यासाठी सोडले. सर्व जनावरे गावाच्या लगत असलेल्या आवलमारी रस्त्यावरील नाल्याच्या पुराच्या पाण्यातून देवलमारी गावाकडे येत होती. मात्र पाण्यात विद्युत खांब बुडाल्याने पाण्यात विद्युत प्रवाह सुरू होता. यामुळे विद्युत धक्क्याने 16 जनावरे मृत्युमुखी पडली. त्यांचे मृतदेह सापडले असून अद्याप 33 जनावरांचा पत्ता लागला नाही. विद्युत धक्क्याने त्यांचाही मृत्यू होऊन ते पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मानवी जीवितहानी टळली
भोई समाजाचे लोक सकाळीच डोंगे बांधण्यासाठी नदीकडे जाणार होते, मात्र आज ते नदीकडे गेले नाही. त्यामुळे ते बचावले.
विद्युत विभागाने पूरपरिस्थिती बघून वेळीच विद्युत प्रवाह बंद केला असता तर जनावरांची जीवितहानी टळली असती. एकूण 15 शेतकऱ्यांचे एकूण 49 जनावरांचे नुकसान झाले आहे अशी माहिती गावाच्या पटवारी भावना सोनकुसरे यांनी लोकमतला दिली.