गडचिरोलीत ठार करण्यात आलेल्या 16 पैकी 11 नक्षलवाद्यांवर होतं 76 लाखांचं बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 07:17 PM2018-04-23T19:17:05+5:302018-04-23T21:03:20+5:30
11 बंदुका जप्त; 5 जणांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू
गडचिरोली: नक्षलविरोधी अभियानादरम्यान रविवारी गडचिरोली पोलिसांच्या बंदुकीने वेध घेतलेल्या 16 मृत नक्षलींपैकी 11 जणांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यात नक्षल दलमच्या 3 वरिष्ठ नेत्यांसह 3 महिलांचाही समावेश आहे. त्या 11 जणांवर एकूण 76 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आलं होतं.
ओळख पटलेल्या नक्षलवाद्यांमध्ये साईनाथ ऊर्फ दुलेश मादी आत्राम (३२ वर्षे, पेरमिली दलम कमांडर) (बक्षीस १६,००,००० रुपये), श्रीनु उर्फ श्रीकांत उर्फ रावतू विजेंद्र (५० वर्षे, दक्षिण विभाग कमांडर) (बक्षीस २०,००,००० रुपये), राजेश ऊर्फ दामा रायसु नरुटी (स्टाफ टिप पीपीसीएम) (४,००,००० रुपये), सुमन ऊर्फ जन्नी कुळयेटी (१८ वर्षे, प्लाटून क्रमांक ०७ सदस्य) (४,००,००० रुपये), शांता ऊर्फ मंगली पदा (३१ वर्षे, अहेरी दलम कमांडर) (८,००,००० रुपये), नागेश ऊर्फ दुलसा कन्ना नरोट (३२ वर्षे, पेरमिली दलम एसीएम) (६,००,००० रुपये), तिरुपती ऊर्फ धर्मु पुंगाटी (२४ वर्षे, पेरमिली दलम सदस्य) (२,००,००० रुपये), श्रीकांत ऊर्फ दुलसा ऊर्फ रानु नरोटे (२३ वर्षे, पेरमिली दलम सदस्य) (२,००,००० रुपये), राजू ऊर्फ रमेश ऊर्फ नरेशकुटके वेलादी (२९ वर्षे, गट्टा एलओएस कमांडर) (८,००,००० रुपये), सन्नू ऊर्फ बिच्छु बोळका गावडे (४४ वर्षे, प्लाटून क्रमांक ०७ सदस्य) (४,००,००० रुपये), अनिता ऊर्फ बाली रामजी मडावी (२४ वर्षे, पेरमिली दलम सदस्य) (२,००,००० रुपये) आदींचा समावेश आहे. उर्वरित 5 नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओळख न पटलेल्यांमधे 4 महिला व एका पुरूष नक्षलवाद्याचा समावेश आहे.
रविवारी संध्याकाळपर्यंत चाललेल्या शोधमोहिमेत पोलिसांना मृत नक्षलींकडे 11 बंदुका सापडल्या. त्यात दोन एके 47, दोन एसएलआर आणि 7 इतर बंदुका आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी अहेरीत जाऊन ही मोहीम यशस्वी करणाऱ्या चमूचे अभिनंदन केले.