१६ ठिकाणचे पाणी नमुने दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:29 AM2018-08-02T00:29:07+5:302018-08-02T00:30:24+5:30
ग्राम पंचायतस्तरावरील पाणी नमून्याची तपासणी जिल्हास्तरावरील प्रयोगशाळेत केली जाते. जून महिन्यात १२ तालुक्यातील एकूण १ हजार ५४५ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी चार तालुक्यातील १६ पाणी नमुने दूषित आढळून आले. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ९ हजार ४४७ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्राम पंचायतस्तरावरील पाणी नमून्याची तपासणी जिल्हास्तरावरील प्रयोगशाळेत केली जाते. जून महिन्यात १२ तालुक्यातील एकूण १ हजार ५४५ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी चार तालुक्यातील १६ पाणी नमुने दूषित आढळून आले. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ९ हजार ४४७ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
पिण्याच्या पाण्यासंदर्भात पावसाळ्यात प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. दूषित पाण्यापासून कॉलरा, ग्रस्ट्रो, अतिसार, हगवन, टायफाईड आदींसारखे आजार बळावतात. दूषित पाणी पिल्याने नागरिकांचे आरोग्य लवकरच धोक्यात येते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत नेहमी जनजागृती करून नागरिकांनी शुद्ध पाणी प्यावे, असे आवाहन केले जाते. प्रशासनाच्या वतीने दर महिन्यात ग्रामपंचायतस्तरावरील पाणी नमूने घेऊन त्याची तपासणी केली जाते. या तपासणीच्या अहवालानुसार संबंधित ग्रामपंचायतींना हिरवे, लाल, पिवळे अशा तीन प्रकारचे कार्ड दिले जातात. जून २०१८ मध्ये गडचिरोली तालुक्यातील २९९ पाणी नमून्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी दोन नमूने दूषित आढळून आले. धानोरा तालुक्यातील ९० पाणी नमून्यांची तपासणी करण्यात आली. यात एकही नमूना दूषित आढळला नाही. आरमोरी तालुक्यातील ३७५ पाणी नमून्यांपैकी ४ नमुने दूषित आढळून आले. देसाईगंज तालुक्यातील २०३ नमून्यांपैकी २ तर कुरखेडा तालुक्यातील १०४ नमून्यांपैकी ८ नमूने दूषित आढळून आले. उर्वरित कोरची, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड या तालुक्यातील पाणी नमून्यांची तपासणी करण्यात आली. मात्र एकही नमूना दूषित आढळून आला नाही. कोरची तालुक्यात २८, चामोर्शी तालुक्यातील २६३, मुलचेरा ३८, अहेरी ५२ व एटापल्ली तालुक्यातील ८३ तसेच भामरागड तालुक्यातील १० पाणी नमून्यांची तपासणी करण्यात आली. सिरोंचा तालुक्यातून जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत ग्रामपंचायतीच्या वतीने जून महिन्यात एकही पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले नाही.
गडचिरोली तालुक्यातील २ दूषित पाणी नमून्यातील दूषित पाण्याचे प्रमाण ०.६७ आहे. आरमोरी तालुक्याच्या ४ पाणी नमुन्याच्या तपासणीअंती दूषित पाण्याचे प्रमाण १.०७, देसाईगंजातील २ पाणी नमून्याच्या तपासणीअंती ०.९९, कुरखेडा तालुक्याच्या ८ पाणी नमूने तपासणीअंती दूषित पाण्याचे प्रमाण ७.६९ इतके आढळून आले. तपासणीनंतर पाण्यातील दूषिताचे प्रमाण ७ पेक्षा अधिक असल्यास ते धोक्याचे असते. त्यामुळे संबंधित गावांमध्ये जलजन्य आजार पसरण्याची शक्यता असते.
पाच ग्रामपंचायतींना मिळाले लाल कार्ड
पाणी स्त्रोताच्या ठिकाणचे प्लॅटफॉर्म फुटलेले असणे, सभोवताल घाणीचे साम्राज्य तसेच नियमित पाणी दूषित येत असल्यास संबंधित गावाच्या ग्रामपंचायतींना जि.प.आरोग्य विभागाच्या वतीने लाल कार्ड दिले जाते. एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या पाणी स्त्रोताच्या सर्वेक्षणानुसार अहेरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात आले आहे. यामध्ये रेपनपल्ली, खांदला, राजाराम व नागेपल्ली, खमनचेरू आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायतींनी पाणी स्त्रोताच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी, पाणी शुद्ध येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.