जिल्ह्यातील १६०० गावे काेराेनामुक्त, उरले केवळ ३४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:43 AM2021-08-18T04:43:48+5:302021-08-18T04:43:48+5:30
गडचिराेली : आराेग्य यंत्रणेच्या परिश्रमामुळे आणि प्रशासनाने केलेल्या उपाययाेजनांमुळे गडचिराेली जिल्हा काेराेनामुक्तीच्या वाटेवर आहे. जिल्ह्यात एकूण जवळपास १६५० गावे ...
गडचिराेली : आराेग्य यंत्रणेच्या परिश्रमामुळे आणि प्रशासनाने केलेल्या उपाययाेजनांमुळे गडचिराेली जिल्हा काेराेनामुक्तीच्या वाटेवर आहे. जिल्ह्यात एकूण जवळपास १६५० गावे आहेत. यापैकी १६१० गावे काेराेनामुक्त झाली असून केवळ १५ ते १७ गावात काेराेनाबाधित रुग्ण उरले आहेत. विशेष म्हणजे १२ पैकी ९ तालुके कोरोनामुक्त झाले असून, सद्यस्थितीत तीनच तालुके काेराेनाच्या सावटात आहेत.
सध्या जिल्हाभरात ३४ कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. चामाेर्शी, धानाेरा, मुलचेरा, गडचिराेली या चार तालुक्यांत काेराेनाबाधित रुग्ण आहेत. आराेग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत आरमाेरी तालुक्यात एक, भामरागड तालुक्यात एक, धानाेरा तालुक्यात दाेन बाधित रुग्ण आहेत. याशिवाय गडचिराेली तालुक्यात १८, मुलचेरा ४ व चामाेर्शी तालुक्यात ८ रुग्ण आहेत. जिल्ह्यातील अहेरी, एटापल्ली, कुरखेडा, काेरची, सिराेंचा व देसाईगंज हे सहा तालुके काही दिवसांपूर्वीच १०० टक्के काेराेनामुक्त झाले आहेत.
बाॅक्स
दरराेज ४०० वर चाचण्या
गडचिराेली जिल्हास्तरासह तालुकास्तरावरील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात मिळून दरराेज ४०० पेक्षा जास्त नागरिकांची काेरोना तपासणी केली जात आहे. १७ ऑगस्ट राेजी मंगळवारी जिल्हाभरात ३९६ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. यापैकी केवळ एक रुग्ण बाधित आढळला आहे.
(बॉक्स)
जिल्ह्याबाहेरील महिला आढळताहेत बाधित
गडचिराेली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात सीझर व नाॅर्मल प्रसूतीसाठी दरराेज अनेक महिला भरती हाेतात. गडचिराेली जिल्ह्यासह लगतच्या चंद्रपूर, गाेंदिया, भंडारा जिल्ह्यातील महिला रुग्ण या रुग्णालयात येतात. जिल्ह्याबाहेरील भागातून आलेल्या प्रत्येक गर्भवती महिलांची काेराेना चाचणी केली जात आहे. यात काही महिलांचा अहवाल पाॅझिटिव्ह आढळून येत आहे. गडचिराेली तालुक्यात सध्या १८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात महिला रुग्णालयात आलेल्या रुग्णांचा समावेश आहे.
(बॉक्स)
सक्रिय रुग्णांचे प्रमाण घटले
गडचिराेली जिल्ह्यात काेराेना रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण सद्यस्थितीत ९७.४६ टक्के आहे. क्रियाशील (सक्रिय) रुग्णांचे प्रमाण घटले असून ते ०.११ टक्क्यांवर आले आहे. गडचिराेली जिल्हा काेराेनामुक्तीच्या वाटेवर असल्याने शासन व प्रशासनाने येथील निर्बंध उठविले आहेत.