एटापल्लीच्या १७ नगरसेवकांचे दारूबंदीला समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:32 AM2021-02-15T04:32:16+5:302021-02-15T04:32:16+5:30
एटापल्ली : जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यापासून दारूचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात अवैधरीत्या येणाऱ्या दारूवर नियंत्रण मिळवून दारूबंदीची प्रभावी ...
एटापल्ली : जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यापासून दारूचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात अवैधरीत्या येणाऱ्या दारूवर नियंत्रण मिळवून दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी विनंती एटापल्ली नगर पंचायतीच्या १७ नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सोबतच जिल्हा दारूबंदीला पाठिंबा दर्शविला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदीसाठी सन १९८७-९३ अशी तब्बल सहा वर्षे अहिंसक मार्गाने जनआंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला प्रतिसाद देऊन महाराष्ट्र शासनाने सन १९९३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू केली. या दारूबंदीमुळे महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील दारूचे प्रमाण नक्कीच कमी झाले आहे. परिणामत: आर्थिक बचतीसोबत, स्त्रियांची सामूहिक शक्ती आणि सुरक्षितता यामध्ये वाढ झाली. गावपातळीवरची लोकशाही बळकट झाली आहे. जिल्हा दारूबंदी प्रभावी करण्यासाठी हजाराहून अधिक गावांनी पुढाकार घेतला आहे. एटापल्ली नगर पंचायतीच्या १७ नगरसेवकांनी सुद्धा समर्थन दर्शविले आहे. यात नगर पंचायत अध्यक्ष दीपयंती पेंदाम, उपाध्यक्ष रमेश गंपावार, नगरसेवक किसन हिचामी, किरण लेकामी, भारती इष्टाम, नामदेव दुर्गे, तानाजी दुर्वा, दीपक सोनटक्के, राहुल गावडे, रेखा मोहुर्ले, रमेश मट्टामी, अश्विनी आईलवार, सगुणा हिचामी, सुनीता चांदेकर, ज्ञानेश्वर रामटेके, शारदा उल्लीवार, योगेश्वर नल्लावार यांचा समावेश आहे.