आरमोरी तालुक्यात १७ ग्रामपंचायतींमध्ये महिलाच होणार कारभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:39 AM2021-02-09T04:39:46+5:302021-02-09T04:39:46+5:30
तालुक्यातील ३२ पैकी १४ ग्रामपंचायत अनुसूचित क्षेत्रातील तर १८ ग्रामपंचायती अनुसूचित क्षेत्राबाहेरील आहेत. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतचे ...
तालुक्यातील ३२ पैकी १४ ग्रामपंचायत अनुसूचित क्षेत्रातील तर १८ ग्रामपंचायती अनुसूचित क्षेत्राबाहेरील आहेत. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतचे सरपंचपद हे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. आरमोरी तहसील कार्यालयात ईश्वरचिठ्ठीद्वारे सरपंच आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यामध्ये पळसगाव, नरचुली, मानापूर, देलंनवाडी, देऊळगाव, कुरंडीमाल, वडधा, कोजबी या ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे. तर वासाळा, वैरागड, जोगीसाखरा, सायगाव, बोरीचक या ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलांसाठी, तसेच इंजेवारी, कुलकुली, डोंगरगाव (भु.) या ग्रामपंचायती नामप्र महिलांसाठी आणि डोंगरसावंगी ही ग्रामपंचायत अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. या १७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची सूत्रे महिलांच्या हाती येणार आहेत.
कोरेगाव (रांगी), पिसेवडधा, सुकाळा, ठाणेगाव, भाकरोंडी, सिर्सी, मोहझरी आदी अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी राखीव झाले आहे. वघाळा, शिवणी(बुज), चामोर्शी (माल), कासवी, शंकरनगर या ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण तर चुरमुरा व देलोडा (बुज)चे सरपंचपद नामप्रसाठी राखीव झाले असून किटाळीचे सरपंचपद अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी राखीव झाले आहे.
आरक्षण सोडतप्रसंगी तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्यासोबत ठाणेदार दिगंबर सूर्यवंशी, नायब तहसीलदार राठोड हेही उपस्थित होते.