१७ लाख रोपांची होणार लागवड

By admin | Published: May 31, 2017 02:18 AM2017-05-31T02:18:35+5:302017-05-31T02:18:35+5:30

वृक्ष लागवड उपक्रमाअंतर्गत १ ते ७ जुलै या कालावधीत जिल्हाभरात सुमारे १७ लाख १७ हजार वृक्षांची लागवड

17 lakhs of plants will be planted | १७ लाख रोपांची होणार लागवड

१७ लाख रोपांची होणार लागवड

Next

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : वन विभाग लावणार १० लाख ५१ हजार वृक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वृक्ष लागवड उपक्रमाअंतर्गत १ ते ७ जुलै या कालावधीत जिल्हाभरात सुमारे १७ लाख १७ हजार वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. गडचिरोली जिल्ह्याला १५ लाख ७८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते, अशी माहिती गडचिरोली वन विभागाचे उपवनसंरक्षक फुले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक विभागीय वनाधिकारी बी. पी. ब्राम्हणे उपस्थित होते. १ ते ७ जुलै या कालावधीत वृक्ष लागवड सप्ताह आयोजित केला जाणार आहे. याअंतर्गत राज्यभरात ४ कोटी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्याला १५ लाख ७८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट राज्य शासनाने दिले होते. यापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असून १७ लाख १७ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये वन विभाग १० लाख ५१ हजार, वन विकास महामंडळ ३ लाख ७ हजार, सामाजिक वनीकरण ४२ हजार, ग्राम पंचायत १ लाख ६६ हजार ३४२ व इतर यंत्रणा ९० हजार २५४ वृक्षांची लागवड करणार आहेत. वन विभाग ९९९.६३ हेक्टरवर वृक्ष लागवड करणार आहे. वन विकास महामंडळ ३९२.२६ हेक्टर, सामाजिक वनीकरण विभाग ६५.५ किमी अंतरावर वृक्ष लागवड करणार आहे. प्रत्येक ग्राम पंचायतीला सरासरी ३६४ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. रोप लागवड व संवर्धनासाठी जनतेचा जास्तीत जास्त सहभाग होण्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर हरीत सेना नावाची साईट सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत १४ हजार नागरिकांनी सदस्यत्व स्वीकारले आहे. ईच्छुक व्यक्तींना ग्रीन आर्मिचे सदस्य होण्यासाठी काही अडचण असल्यास गडचिरोली उपवनसंरक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा.
या कार्यालयात स्वतंत्र संगणक कक्ष स्थापित करण्यात आला आहे. सदस्य नोंदणीच्या प्रक्रियेसाठी येथील कर्मचारी मदत करणार आहेत. वृक्ष लागवड हा कार्यक्रम केवळ प्रशासनाचा किंवा शासनाचा नसून प्रत्येक जनतेने या उपक्रमात सहभाग नोंदवावा. वृक्ष लागवड करून ते संवर्धन करण्यासाठी मोहीम उभारावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्राम पंचायत व प्रशासनाच्या मार्फतीनेही वृक्ष लागवडीबाबत जनजागृती केली जाणार आहे.

गडचिरोली व देसाईगंजात वृक्षांचे स्टॉल
गडचिरोली व देसाईगंज शहरात वन विभागाच्या मार्फतीने २५ ते ३० जून या कालावधीत स्टॉल लावून रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या कालावलीत सवलतीच्या दरात रोपे दिली जातील, एका व्यक्तीला जास्तीत जास्त ५ व संस्थेला २५ रोपे दिली जाणार आहेत. १ ते ५ जुलै या कालावधीत मागणीनुसार घरपोच उपलब्ध करून दिली जातील. गडचिरोली शहरात इंदिरा गांधी चौक, जिल्हा रुग्णालयासमोरील बसथांबा व धानोरा मार्गावरील बसस्थानकाच्या परिसरात स्टॉल लावले जाणार असल्याची माहिती गडचिरोलीचे उपवनसंरक्षक फुले यांनी दिली आहे.

Web Title: 17 lakhs of plants will be planted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.