१७० अतिक्रमणधारकांना नोटीस
By admin | Published: May 14, 2016 01:16 AM2016-05-14T01:16:33+5:302016-05-14T01:16:33+5:30
साकोली-देसाईगंज-गडचिरोली-सिरोंचा या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडाराचे सहायक अभियंता
सहायक अभियंत्यांची कारवाई : साकोली-देसाईगंज-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग
देसाईगंज : साकोली-देसाईगंज-गडचिरोली-सिरोंचा या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडाराचे सहायक अभियंता श्रीकांत सुखदेवे यांनी देसाईगंज शहरातील १७० अतिक्रमणधारकांना ११ मे रोजी नोटीस बजावली.
देसाईगंज शहरातील मुख्य मार्गावरील साकोली-वडसा-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ सी च्या महामार्गाच्या जमिनीवर किमी ६३/२०० वर उजव्या/डाव्या बाजुस ४ मीटर बाय ३ मीटर जागेवर अनधिकृतरीत्या अतिक्रमण करून कब्जा केल्याने अतिक्रमणधारकांना उत्तरवादी ठरवून नोटीस प्राप्त झाल्यापासून ७ दिवसांच्या आत अनधिकृत कब्जा हटविण्याच्या सूचना नोटीसद्वारे देण्यात आल्या आहेत. सदर नोटीस अनुसूची ३ नियम ११ नुसार अनधिकृत कब्जा हटविण्याबाबत सूचनेतील राष्ट्रीय राज्यमार्ग नियंत्रण (भूमी आणि वाहतूक) अधिनियम २००२ च्या नियम २६ उपकलम (२) नुसार सहायक अभियंत्यांनी नोटीस बजावली आहे. नोटीस पाठविल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग क्र. १४ नागपूर येथे सदर जागेबाबत अधिकृत कागदपत्रांसह अभिवेदन करण्याची संधी देण्यात आली आहे. अशा अभिवेदनधारकांना १६ मे रोजी पूर्ण सुनावणी करण्यात येणार आहे. या नोटीसचे अनुपालन करण्यात अयशस्वी ठरल्यास राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (भूमी व वाहतूक) अधिनियम २००२ च्या कलम २६ उपकलम (२) नुसार शास्ती लादून अतिक्रमण निष्काशीत केले जाईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान देसाईगंज शहरात नोटीस पाठविल्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ माजली आहे.
अतिक्रमणधारकांनी अनधिकृत अतिक्रमण स्वत: काढून टाकावे, असे आवाहन सहायक अभियंता श्रीकांत सुखदेवे यांनी केले आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे. लवकरच अतिक्रमण हटविले जाईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडाराचे सहायक अभियंता श्रीकांत सुखदेवे यांनी दिली आहे.