१७४६ शेतकऱ्यांना १३ कोटींपेक्षा जास्त रकमेच्या धान चुकाऱ्यांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:38 AM2021-07-30T04:38:18+5:302021-07-30T04:38:18+5:30
रब्बी हंगामातील धानाची विक्री मार्केटिंग फेडरेशनच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर करण्यासाठी टोकण काढून नोंदणी केली होती. प्रत्यक्ष ...
रब्बी हंगामातील धानाची विक्री मार्केटिंग फेडरेशनच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर करण्यासाठी टोकण काढून नोंदणी केली होती. प्रत्यक्ष हमीभावाने केंद्रावर धानाची विक्रीसुद्धा केली . त्यापैकी १२ जूनपर्यंत धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली; परंतु १४ जूननंतर धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे अजूनपर्यंत जमा झाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तालुक्यातील १७४६ शेतकरी आपले धानाचे चुकारे कधी जमा होणार, याची प्रतीक्षा करीत आहेत.
रब्बी पणन हंगाम २०२०-२१ चा कालावधी हा १ मे २०२१ ते ३० जून २०२१ होता; परंतु पुढे धान खरेदीला मुदतवाढ मिळाल्याने तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या धानाची विक्री केली. खरीप हंगाम २०२१-२२ ला सुरुवात झाली. अनेकांनी धान पिकाची रोवणी केली. रासायनिक खताची खरेदी केली; परंतु अजूनपर्यंत धानाचे चुकारे जमा न झाल्याने मजुरांच्या रोजीची रक्कम द्यावी कुठून? फवारणी औषधाची खरेदी कशी करावी? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
बाॅक्स :
बोनसही प्रलंबित
खरीप हंगाम २०२०-२१ मधील धानाचे बोनसही फक्त ५० टक्के जमा झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदीचे धानाचे चुकारे तसचे खरीप हंगाम २०२०-२१ मधील उर्वरित ५० टक्के बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.