१८ आदर्श गुरूजींचा गौरव
By admin | Published: September 10, 2016 01:11 AM2016-09-10T01:11:33+5:302016-09-10T01:11:33+5:30
जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार
शिक्षक पुरस्कार प्रदान : सक्षम व गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्याचे मान्यवरांचे आवाहन
गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात जिल्हाभरातील एकूण १८ आदर्श शिक्षकांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे तर अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जावडे, समाज कल्याण सभापती विश्वास भोवते, महिला व बाल कल्याण सभापती सुवर्णा खरवडे, बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, जि.प. सदस्य पद्माकर मानकर, शांता परसे, पुनम गुरनुले, अॅड. गजानन दुगा, वर्षा गावतुरे, पोरेटी, अशोक इंदुरकर, लैजा चालुरकर, पं.स. सदस्य सविता कावळे, वित्त व लेखाधिकारी राऊत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नानाजी आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पुरसलगोंदीचे शिक्षक विजयकुमार हनुमय्या बुद्धावार, कोरची तालुक्यातील पकनाभट्टी जि.प. शाळेचे शिक्षक ओमकार चिंतामन ठलाल, अहेरी तालुक्यातील महागाव (बुज) शाळेचे शिक्षक सुधाकर भीमराव टेकूल, चामोर्शी तालुक्यातील रामपूर शाळेचे शिक्षक उमेश मारोती कोटनाके, आरमोरी तालुक्यातील वडधा शाळेचे शिक्षक सैनू महारू उसेंडी, सिरोंचा तालुक्यातील लक्ष्मीपूर येथील शिक्षक मधुकर चिन्ना बट्टीवार, देसाईगंज तालुक्यातील तुळशी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर सावजी मेश्राम, कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव शाळेतील शिक्षक नरेश रामजी बन्सोड यांचा आदर्श शिक्षक सपत्नीक सन्मान करण्यात आला. माध्यमिक विभागातून देसाईगंज तालुक्याच्या कुरूड जि.प. हायस्कूलचे नोमेश्वर भगवान मेश्राम, गडचिरोली जि.प. शाळेचे उच्च माध्यमिक शिक्षक सुनिल श्रावण चंदनगिरीवार यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना जि.प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे म्हणाले, प्रत्येक माणसाच्या जीवनात शिक्षकांची भूमिका अनन्य साधारण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे आदर्श व विशेष पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्त्वाने घडलेले आदर्श विद्यार्थी घडवावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांनी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी शिक्षकांनी घडवावेत, तसेच आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपला आदर्श कायम टिकवून ठेवावा. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करावेत, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे, संचालन केंद्र प्रमुख राजू वडपल्लीवार यांनी केले तर आभार शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नानाजी आत्राम यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)
१७ शिक्षक उपस्थित,
एक गैरहजर
राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेले भिकारमौशी जि.प. शाळेचे प्राथमिक शिक्षक भाऊराव धर्माजी कुनघाडकर हे समारंभाला गैरहजर होते. त्यांचा पुरस्कार गडचिरोली पं.स.चे गट शिक्षणाधिकारी उद्धव डांगे यांनी स्वीकारला. उर्वरित सर्वच १७ शिक्षक आपल्या कुटुंबियासह आर्वजून उपस्थित होते.
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचाही सत्कार
राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी यंदा गडचिरोली जिल्ह्यातील चार शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यांचा राज्य शासनाच्या वतीने सन्मान होणे शिल्लक आहे. मात्र निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने या चार शिक्षकांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. यामध्ये गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत शंकरराव मल्लेलवार हायस्कूल बोदलीचे मुख्याध्यापक मनिष भरतकुमार शेट्ये, नगरी जि.प. शाळेचे पदवीधर प्राथमिक शिक्षक राजेंद्र निलकंठ घुगरे, भिकारमौशी शाळेचे प्राथमकि शिक्षक भाऊराव धर्माजी कुनघाडकर व कोरची पंचायत समिती अंतर्गत भिमपूर शाळेचे शिक्षक प्रभू सीताराम वैद्य यांचा समावेश आहे.